वाजपेयींना साताऱ्यात भावपूर्ण अभिवादन


सातारा : माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले, यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी अस्थीकलश भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याकडे सुपूर्त केला, हा अस्थीकलश शिरवळ येथे पुष्पांजली वाहण्यासाठी ठेवण्यात आला.

यानंतर शिरवळ येथे अस्थिकलशाची पायी मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूक झाल्यावर अस्थीकलश रथामध्ये ठेवण्यात आला आणि साताराकडे प्रयाण करण्यात आले. वाटेमध्ये वेळे, सुरुर फाटा, उडतारे, लिंब फाटा येथे दर्शनासाठी रथ थांबवण्यात आला, यानंतर सातारा शहराच्या वेशीवर वाढे फाटा येथे अस्थीकलशाचे स्वागत करण्यात आले, नंतर जुना आरटीओ चौकात, राधिका चौक आणि मोतीचौक येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर रथ राजवाडा बस स्टॉप जवळ ठेवण्यात आला.

सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते मंडळी यांनी या वेळी पुष्पांजली वाहिली, सातारा शहरातून बाहेर पडताना, खणआळी चौक, पोवई नाका, गोडोली नाका या ठिकाणी पुष्पांजली वाहण्यात आली, यानंतर नागठाणे, उंब्रज, तासवडे टोल नाका या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करण्यात आली. नंतर अस्थीकलश कराड शहरात नेण्यात आला, अस्थिकलशाची कराड शहरातून मिरवणूक काढण्यात आली आणि पवित्र आशा प्रीतिसंगमावर जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

या वेळी ना अतुलबाबा भोसले. पुरुषोत्तम जाधव, दिपकबापू पवार,अमितदादा कदम, महेश शिंदे, मनोज घोरपडे,अनिल देसाई, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरतनाना पाटील, अविनाश फरांदे, कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे, वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मुकुंद आफळे, सातारा जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, सर्व मोर्चे, आघाड्याचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी यांचेसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.