झाडांना खिळेमुक्त करण्याचा संवेदनशील सातारकरांचा उपक्रम


सातारा : झाडांना खिळेमुक्त करण्याचा विधायक उपक्रम आम्ही कराडकर व आंघोळीची गोळी ग्रुपच्या सदस्यांनी सातारा शहरामध्ये सुरू केला आहे. जिल्ह्यासोबत शहर परिसरात अनेक झाडांवरती खिळे ठोकुन, अथवा तारा बांधून जाहिराती लावल्याचे पहायला मिळते. झाडांना संवेदना असतात असे भारतीय वैज्ञानिक जगदिशचंद्र बोस यांनी आपल्या प्रयोगातून सिध्द केले आहे. तरी देखील झाडांना खिळे ठोकुन दु:ख यातना देणाऱ्या असंवेदनशील नागरिकांच्या कृतीचा निषेध कृतीतून करताना खिळे मुक्त झाडे हा संकल्प सुरू केला आसल्याची माहिती नितीन पवार यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.

झाडांवर खिळे ठोकणे, जाहिराती लावणे यावर कायदयाने बंदी आहे. तरी देखील राजरोसपणे शहर तसेच जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. याबाबत प्रशासन असे कृत्य करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करत नाही याची खंत वाटते. सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत विनापरवाना झाडांवरती असे जाहिरात फलक अनेकदा लावले जात आहेत. राजवाडा चौपाटी परिसरात असेच फलक लावल्यामुळे दोन झाडे मृत झाली होती. आम्ही कराडकर सातारा वासी, आंघोळीची गोळी, स्वराज्य हिंदू प्रतिष्ठान पाणी बॅंक, या संस्थाचे सदस्य एकत्र मिळून, आठवडयाच्या प्रत्येक रविवारी शहरातील विविध भागातील झाडे खिळेमुक्त करत आहेत. आत्तापर्यंत पोवई नाका ते-वाढे फाटा, बॉंम्बे रेस्टॉंरंट, सदर बझार, वाय.सी. कॉंलेज,शिवाजी कॉलेज, विसावा नाका, नगरपालिका परिसरात एकूण 20 किलो भरतील इतके खिळे काढले आहेत. या संस्थांच्या सदस्यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच सातारा वनविभाग व नगरपरिषदेला याबाबत निवेदने दिली असून या प्रकारामध्ये कोणत्याही स्वरूपात अद्याप कारवाई झाली नाही.

No comments

Powered by Blogger.