सदस्यांनी वाजवली शिक्षण विभागाची घंटा


कराड : प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रारंभ होऊन तीन महिने झाले तरीही तालुक्यातील पहिली, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना अजूनही शालेय पुस्तके दिली गेलेली नाहीत. नुकत्याच शाळांमध्ये चाचणी परीक्षा झाल्या. पुस्तकेच नसतील तर मुले परीक्षा काय देणार? विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके कमी पडल्याची माहिती पंचायत समितीच्या एकाही सभेत दिली गेली नसल्याच्या कारणावरुन सदस्यांनी शिक्षण विभागावर जोरदार ताशेरे ओढत सदस्यांनीच शिक्षणविभागाची घंटा वाजविली.

कराड पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती फरिदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण विभागाचा आढावा घेताना प्रभारी गटशिक्षण अधिकारी जमिला मुलाणी यांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून कराड तालुक्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच याच दिवशी स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी इतर आढाव्यानंतर पंचायत समिती सदस्य मदने यांनी ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यालयातील मुलांना शाळांना प्रारंभ होऊन तीन महिने झाले तरी पुस्तके मिळाली नसल्याचे सांगत मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुलाणी यांनी तालुक्यातील पहिली, पाचवी व आठवीची एकूण 350 पुस्तके कमी पडल्याचे सांगितले. याबाबत अनेक पत्रव्यवहार जिल्हा व राज्य शिक्षण विभागाला केले आहेत. परंतु अजूनही पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. यावर उपसभापती सुहास बोराटे व इतर सदस्यांनी आम्हाला याची माहिती दिली असती तर आम्ही आमच्यापरीने प्रयत्न केले असल्याचे सांगितले.

आज जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधांकडे बघून अनेक जण जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत आपणच कमी पडत असू तर शाळांच्या पटसंख्येवरही याचा परिणाम होऊ शकतो.
ही बाब गंभीर असून याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी मुलाणी यांनी तीन विस्तारअधिकारी दहा विस्तारअधिकार्‍यांचे काम करत असल्याचे सांगत तालुक्यातील असणार्‍या अनेक रिक्त पदे तात्काळ भरली जावीत अशी विनंती केली.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेताना अधिकार्‍यांनी तालुक्यातील 23 गावांमधील 44 ठिकाणी आरओ यंत्रणा मंजूर करण्यात आली असल्याचे सांगितले. याचे सर्वांनी स्वागत केले. बांधकाम विभागाच्या आढाव्यावेळी माजी पंचायत समिती सभापती देवराज पाटील यांनी पालीचे खंडोबा देवस्थान ब वर्गात मोडते. या देवस्थानच्या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून 7 ते 8 लाख लोक दर्शनासाठी येत असतात. येथे अनेक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गेली तीन वर्षे निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र अजूनही पैसे उपलब्ध झाले नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत पंचायत समितीच्या माध्यमातून सभेत ठराव करुन पाठपुरावा व्हावा अशी मागणी केली.

त्याचबरोबर नेरळेवाडी-पांचुब्री येथील ग्रामसेवकाबाबत अनेकांच्या तक्रारी आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची एकमुखी मागणी सदस्यांनी केली. गटविकास अधिकारी पवार यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2 कोटी 37 लाखाचा निधी मंजूर झाला असून त्यासाठी नव्याने प्रस्ताव घेण्यात यावे, अशा सूचना केल्या. सभेत आरोग्य, कृषी, अंगणवाडी, शिक्षण अनेक विभागाचा आढावा घेण्यात आला.

No comments

Powered by Blogger.