आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

अवैध सावकारीप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकास अटकफलटण : फलटण येथील चार जणांच्या विरोधात खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी संतोष पवार यास अटक करण्यात आली आहे. युवराज सुरेश संकपाळ (बोंद्रे) (वय 32, रा. मुरूम, ता. फलटण) यांनी गाडीचा अपघात झाल्याने अमोल वसंत भिलारे या मित्राच्या ओळखीने कै. रवींद्र हरिभाऊ काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण) याच्याकडून 25 लाख रुपये घेतले होते. ते दोन टप्प्यांत काकडे यांना दिले होते.त्यानंतरही विविध कारणे सांगून रविंद्र काकडे याने मला व्याज व मुद्दल धरून देणे लावले.

हे देणे देण्यासाठी मला व कुटुंबियांना शिवीगाळ दमदाटी करत मला मारहाण केल्याची तक्रार युवराज संकपाळ यांनी केली आहे. त्यानंतर जून 2017 मध्ये मी माझ्या आई वडीलांच्या नावावरील मुरुम ता.फलटण येथील 3.5 एकर जमीन विकून 36 लाख रुपये मागितले होते, परंतु आपापसात तडजोड करून हातापाया पडून 25 लाख रोख दिले. एप्रिल 2017 मध्ये मला पैशाची गरज असल्याने व मयत रविंद्र काकडे यांचे सर्व व्याजाचे पैसे देण्यासाठी मी उमेश पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ फलटण यांच्याकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले.

त्यानंतर विजय पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ, फलटण याच्याकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी उमेश पवार यास मुद्दल व व्याज असे 1 लाख 60 हजार परत दिले. विजय पवार याच्याकडून घेतलेल्या 1 लाख 60 हजार रुपये व्याज स्वरूपात दिलेले आहेत. सर्व व्याज देऊनही उमेश पवार व विजय पवार यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये काळज येथे येऊन आमचे राहिलेले व्याज व मुद्दल परत दे, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. त्यानंतर संतोष पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ फलटण याच्याकडून 3 लाख रुपये घेतले. यानंतर डिसेंबर 2017 मध्ये पैसे घेऊन उमेश पवार व विजय पवार यांचे पैसे फलटण येथे जाऊन दिले. त्यानंतर जानेवारी 2018 पासून 5 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रत्येक महिन्यात व्याजासह 1 लाख 60 हजार रुपये दिले आहेत.

त्यानंतर विजय पवार व संतोष पवार, उमेश पवार हे तिघे जण सकाळी घरी मुरुम येथे 9 ऑगस्ट 2018 रोजी आले. यावेळी मी घरी नव्हतो, यावेळी त्यांनी 4 वाजता काळज मुरूम रोडवर येवून भेटायला सांगितले. तेेथे भेटायला गेलो असता मला 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला जीवे मारू, अशी धमकी दिली. मयत रविंद्र काकडे यांचा मोठा मुलगा यांने फार्महाऊसवर बोलवून घेतलेल्या 2 लाख रुपयांची मुद्दल व 6 लाख देऊनही 5 लाख रुपयांची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार संकपाळ यांनी केली आहे. या तक्रारीवरून अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पवार यास अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.