Your Own Digital Platform

जखमी अवस्थेत काढली आख्खी रात्र दरीत


परळी : सातारा-ठोसेघर मार्गावरील बोरणे घाटातून एक कार सव्वाशे फूट खोल दरीत कोसळली. रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडलेली ही दुर्घटना सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोणालाच कळली नाही. तोपर्यंत कारचालक गंभीर जखमी अवस्थेत खोल दरीतच पडून राहिला. त्यांना जागेवरुन उठताही येत नव्हते. काळोखी रात्र, भयावह शांतता, रातकिड्यांचा किर्रर आवाज, अंगावरील जखमांच्या वेदना अन् वारंवार येणार्‍या पावसाच्या सरी अशा स्थितीत त्यांनी खोल दरीत आख्खी रात्र काढली. दुसर्‍या दिवशी गुराख्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना दरीतून वर काढण्यात आले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचे प्राण वाचल्याचा प्रत्यय आला.एखादी दुर्घटना अशी होते की रस्त्यातून चालताना दुचाकी घासून गेली तरी पादचार्‍यांवर मृत्यू झडप घालतो. मात्र बोरणे घाटातील ही दुर्घटना हृदयाचा ठोका चुकवणारी आहे. 

परळी खोर्‍यातील अष्टे या गावचे पुनवर्सन शेळकेवाडी येथे झाले आहे. येथील नारायण अर्जुन पार्टे (वय 35) यांची सासुरवाडी ठोसेघर पठारावरील राजापुरी ही आहे. रविवारी ते राजापुरीला गेले होते. तिथून ते रात्री 8 च्या दरम्यान परत सातारकडे निघाले होते. त्यांची कॉलिस गाडी (एम. एच. 09- 1582) बोरणे घाटात आल्यावर गाडीवरचा ताबा सुटल्याने काही कळण्याआगोदरच ती मोठ्या दगडाला धडकून तिथून पुढे झाडाला घासत खोल दरीत कारी गावाजवळ कोसळली. ही घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. गाडीमध्ये ते एकटेच होते. गाडी दरीत दाट झाडीत असल्याने वरून काहीही समजत नव्हते. पार्टे यांना जबर मार लागला होता. त्यांना जागेवरुन उठताही येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणी येण्याची शक्यताही नव्हती. दाट झाडी, काळोखा अंधार, अधून मधून पडणार्‍या पावसाच्या सरी अशा भयावह अवस्थेत पार्टे यांनी आख्खी रात्र काढली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास दरीच्या खाली कारी येथील गुराखी गुरे चारायला आले होते. त्यावेळी त्यांना कोणीतरी विव्हळत आणि रडत असल्याचा आवाज आला. गुराखी आवाजाच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना एक इसम जखमी अवस्थेत पडल्याचे व अपघात झाल्याचे निदर्शनास आले. गाडीपासून काही अंतरावर नारायण पार्टे पडले होते. त्यांच्या अंगाला जखमा झाल्या होत्या. त्याही अवस्थेत नारायण पार्टे यांनी आपल्या मित्रांना फोन लावण्यासाठी खुणावले. तत्काळ गुराख्याने घटनेचे गांभिर्य ओळखून गाडीतला मोबाईल घेवून त्यांच्या मित्राला फोन केला. त्यांना दुर्घटनेची माहिती दिली. तिथून मग मदत कार्याची चक्रे फिरली. सोमवारी 1.30 च्या दरम्यान त्यांचे मित्र रूग्णवाहिका घेवून आले. त्यांनी खोल दरीत उतरून स्ट्रेचरवर जखमी नारायण यांना बाहेर आणले. अधिक उपचारासाठी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. रात्रभर उघड्यावर पावसात भिजल्याने त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. आष्टे, राजापुरी येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.