Your Own Digital Platform

आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमूठ


कराड : मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने येथील दत्त चौकात महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज सातवा दिवस असून आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आले. ठिय्या आंदोलनात सहभागी मराठ्यांनी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी होणार्‍या आंदोलनासाठी वज्रमुठ आवळली. तसेच आक्रमक झालेल्या मराठा युवकांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे श्राध्द घातले. तर महिलांनी प्रांताधिकार्‍यांसह नागरिकांना ‘गाजर’ देऊन मराठ्यांना गाजर दाखविणार्‍या शासनाचा निषेध केला. 

यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठ्यांना आरक्षण मिळालेच, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सरसकट गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी ठिय्या आंदोलन तर काही ठिकाणी आक्रमक आंदोलन करून जाळपोळ केली जात आहे. कराडमध्ये महिलांचे राज्यातील पहिले ठिय्या आंदोलन सुरु असून मंगळवारी या आंदोलनाचा सातवा दिवस होता. दररोज तालुक्याच्या विविध भागातील मराठा बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी होत आहेत. मंगळवारी मसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली विभागातील मराठा बांधव व भागिनी ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

मसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली परिसरातून आलेल्या मराठा समाजाने सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास येथील विजय दिवस चौकातून आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणिय होता. आंदोलनस्थळी दत्त चौकात आल्यानंतर येथे महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ठिय्या आंदोलनस्थळावरील महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून महिलांनी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी वज्रमुठ आवळत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मसूर, उंब्रजसह कोपर्डे हवेली भागातून आलेल्या युवकांसह मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. याप्रकरणी उपस्थितांसमोर कॉलेज युवतीसह अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या.

मराठ्यांना आंदोलन देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्या युवकांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे श्राध्द घातले. याप्रसंगी मराठा युवकांनी मुंडण करत शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध केला. याचवेळी आंदोलन स्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांसमोरच मराठा युवकांनी शासनाचे श्राध्द घातले. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांसह युवकांनी रस्त्यावर धाव घेत नागरिकांना गाजर वाटप केले. शासन मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ गाजराचे वाटप केल्याचे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.काही आक्रमक झालेल्या महिलांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनाच गाजर देऊन शासनाचा निषेध केला.

दत्त चौकामध्ये मराठा युवकांचे मुंडण आंदोलन तर महिलांचे गाजर वाटप सुरु असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून डीवायएसपी नवनाथ ढवळे हे स्वत: पोलिस फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळावर ठाण मांडून होते.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यासाठी येथील दत्त चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवार आंदोलनाचा सातवा दिवस असून दररोज तालुक्याच्या विविध भागातील मराठा बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनकर्त्यांना गेली सात दिवसांपासून दत्त चौकातील गजानन रेस्टॉरंटच्यावतीने मोफत चहा व नाष्टा दिला जात आहे. तर शिवराज ढाब्याच्यावतीने मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. आंदोलनाला सहकार्य केल्याबद्दत आज गजानन रेस्टॉरंट व शिवराज ढाब्याच्या मालकांचा मराठा बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.