Your Own Digital Platform

साताऱ्याच्या काळजात रूतलेली मोरूची मावशी


सातारा : लयबध्द चालीत पदरं हातात घेऊन गिरकी घेणारी मोरूची मावशी, तिची विंगेतील एण्ट्री एकदमचं ठसकेबाज टांग टिंग टिंगा म्हणत ती सगळ्याच्या काळजात शिरली मात्र नियतीने तिची अचानक एक्‍झिट घडवली आणि साताऱ्याचा जीव गलबलला. अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाल्याची खबरं आली आणि साताऱ्यातील विजयच्या आठवणी झरंझरं डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अरूण गोडबोले आपल्या कौशिक’ चित्रनिर्मितीच्या धुमाकूळ व बंडलबाज या चित्रपटांची तीस वर्षापूर्वीची आठवण उलगडत होते. 

निमित्त होते अर्थात विजय चव्हाण. तब्बल 350 मराठी चित्रपट आणि अठ्ठावीस नाटकं, भूमिकेचा अचूक बेअरिंग पकडणारा आणि ग्लॅमरचे नखरे न करणारा साधा सरळ माणूस. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विजयला’ काण्या’ असे नाव ठेवले होते. तेच नाव नंतर तोंडात रुळले मात्र मी त्याला खाजगीत त्या नावाने ओळखायचो. गोडबोले पुढे सांगत होते एका रात्री गणेशोत्सवात अचानक विजयचा फोन आला आणि त्याने मला तातडीने अजिंक्‍यतारा कारखान्यावर यायला सांगितले. 

मागील वर्षी याच हंगामात मोरूच्या नाटकाचा प्रयोग अचानक रद्द झाला होता. त्याच्या अनामतीचे निमित्त करून कामगारांनी या वर्षीचा प्रयोग रोखून धरला होता. माऊली प्रॉडक्‍शनचे उदय धुरतं व विजय दोघेही तणावात होते. स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे व माझे स्नेहाचे संबंध असल्याने तणाव टळला आणि नाटक ही पार पडले. धुरत यांनी आभार मानले तेव्हा आभार कसले मानतायं काण्याने सांगितले येणे भागच होते असे उत्तर दिल्याचे गोडबोले यांनी सांगितले. तीस वर्षापूर्वी असाच पहाटे काण्याचा (अर्थात प्रेमाने …..) मला फोन आला. 

साताऱ्याजवळ महामार्गावर कोल्हापूरवरून येताना इंदिरानगर वसाहतीजवळ बसचालकाचे नियंत्रण झोपेमुळे जाउन कचरा कुंडीला धडक बसली होती. मात्र झोपड्यांचे अथवा रहिवाशांचे नुकसान झाले नव्हते. तेव्हा पण मध्यस्थी केल्याने वादाचा समर प्रसंग टळला होता. विजयशी कधीही गप्पांचा योग आला की तो म्हणायचा, काय गोडबोले साहेब पिक्‍चर कधी सुरु करता य? सर्व आर्टिस्टची जवाबदारी माझी. तुम्ही फकत सांगा हव्या त्या डेटस तुम्ही म्हणाल ते मानधनं असा त्याचा सरळ साधेपणाचा व्यवहार होता. बंडलबाजचा प्रिमिअर साताऱ्यात जयविजला होता तेव्हा अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह विजय आला. पब्लिक डिमांडवर टांग टिंग टिंगावर त्याने असा ठेका धरला की सगळेच खुश झाले. साताऱ्याचा आणि काण्याचा खूप जुना ऋणानुबंध होता तो आता अचानक निःशब्द झाल्याची वेदना अरूणकाकांच्या शब्दातून प्रकट झाली.