पोलिसांचे सशस्त्र संचलन अन् मॉकड्रील


कराड : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, बंद शांततेत पार पडला जावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. सोमवार दि. 6 रोजी सायंकाळी पोलिसांनी शहरातून सशस्त्र संचलन केले. तर मंगळवारी सकाळी विमानतळ व मलकापूरमध्ये मॉकड्रील केले. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर कराड उपविभागातील पोलिस अलर्ट झाल्याचे दिसून आहे. मराठा आरक्षणासाठी गेले अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरु असून जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, 9 ऑगस्ट क्रांतीदिनापर्यंत सरकारने मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करत त्यानंतर महाराष्ट्र बंद केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे.

पोलिसांनी सोमवारी कराड शहरातून सशस्त्र संचलन केले. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संचलनामध्ये शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह 15 एपीआय व पीएसआय, 155 पोलिस कर्मचारी, एसआरपीचे एक अधिकारी व 22 कर्मचारी तसेच 10 होमगार्ड सहभागी झाले होते. शहर पोलिस ठाण्याच्या आवारातून सुरु झालेले हे संचलन शाहू चौक - दत्‍त चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून चावडी चौक तेथून पुढे कन्याशाळा, कृष्णा नाक्यावरून कॉटेज हॉस्पिटल, विजय दिवस चौक, बसस्थानका समोरुन हे संचलन करण्यात आले.

दरम्यान, मंगळवार दि. 7 रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत विमानतळावरील धावपट्टीवर मॉकड्रील करण्यात आले. यावेळी डीवायएसपी यांच्यासह विभागातील सहा अधिकारी, 70 कर्मचारी तसेच एसआरपी प्लाटुन या मॉकड्रील सरावामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर 10 ते 12 यावेळेत मलकापूरमधील पाच मंदीर परिसरात दंगा काबू योजनेचा सराव करण्यात आला. यामध्येही पोलिस अधिकार्‍यांसह शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.