Your Own Digital Platform

नियमबाह्य काम करणार्‍या ठेेकेदारांवर कारवाई


कराड : वीज वितरण कंपनीच्या कराड उपविभागांतर्गत सुरू असणार्‍या अनागोंदी कारभारावर दै. ‘पुढारी’ने प्रकाश टाकल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांनीही याची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी नियमबाह्य काम करणार्‍या ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच शाखा अधिकार्‍यांचीही चौकशी करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वीज वितरण कंपनीच्या कराड विभागांतर्गत असणार्‍या वीज वितरण कंपनीच्या ओगलेवाडीसह कराड शहर, विजयनगर, वारुंजी, वडगाव हवेली, उंब्रज, मलकापूर, मल्हारपेठ, पाटण आदी सर्वच कार्यालयात ठेकेदारांची लॉबी कार्यरत आहे. त्यांचा कार्यालयीन कामकाजातील वाढता हस्तक्षेप, अधिकार्‍यांवर आणला जाणारा दबाव, ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार यामुळे वीज कंपनीतील अधिकारीही त्रस्त आहेत.

काही अधिकार्‍यांचे ठेकेदारांशी साटेलोटे आहे, तर काहीजण स्वतःच कामे घेत आहेत. या सार्‍या अनागोंदी कारभारावर दै. पुढारीने ‘कॉन्ट्रॅक्टरचा करंट’ या मथळ्याखाली लेखमाला प्रसिध्द करून प्रकाश टाकला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. अधिकारीही खडबडून जागे झाले. ठेकेदारांनी सावध पवित्रा घेतला. वरिष्ठ कार्यालयाने या लेखमालेची दखल घेवून याबाबत कार्यालयाकडे लेखी खुलासा मागितला आहे.

कराड विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. महावितरण मधील ठेकेदारांबरोबर मध्यस्थी करून नियमबाह्य काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कंपनी नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच महावितरण कंपनीच्या कामाशी निगडीत ठेकेदार जर कंपनीचे नियमबाह्य काम करत असतील तर त्यांच्यावरही कंपनी नियमाप्रमाणे काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कराड विभागातील वीज ग्राहकांना त्यांनी आवाहन केले आहे की, वीज जोडणी अथवा नवीन कनेक्शन यासह अन्य कोणत्याही कामासाठी संबंधीत शाखा कार्यालय व उपविभागाशी संपर्क साधावा. कोणत्याही ठेकेदारामार्फत कोणत्याही कामासाठी मध्यस्थी करण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांना सेवा देणे, शासकीय योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी महावितरण कंपनी कटिबध्द असून याबाबत ग्राहकांनी काही तक्रारी असल्यास किंवा ठेकेदार, कर्मचारी अथवा शाखा अधिकारी यांच्याकडून कामांची अडवणूक होत असल्यास ग्राहकांनी वीज कंपनीच्या ओगलेवाडी येथील विभागीय कार्यालयाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन अभिमन्यू राख यांनी केले आहे.