Your Own Digital Platform

वाढत्या ऊस आणि फळबाग क्षेत्रासाठी प्रक्रिया सुविधा पुरेशा नाहीत

फलटण : पावसाने दडी मारल्याने तालुक्याच्या आदरकी ते आंदरुड या कायम दुष्काळी पट्ट्यात चिंतेचे वातावरण पसरले होते, लोकवस्ती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता मात्र धोम-बलकवडी प्रकल्पातून कृष्णेचे पाणी सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यात वाढत्या उसाच्या व फळबागांच्या क्षेत्रांसाठी प्रक्रिया उद्योगांची गरज आगामी काळात भासणार असल्याचे जाणवत आहे.
कृष्णेच्या पाण्यामुळे कायम दुष्काळी पट्ट्यातील गिरवी-निरगुडी भागात फळबाग क्षेत्रात वाढ होत असताना पावसाने ओढ दिली, त्याचबरोबर कृष्णेचे पाणी न सुटल्याने संपूर्ण दुष्काळी पट्टा धास्तावला असताना काल शुक्रवार दि. ३ रोजी धोम-बलकवडीमधून पाणी सोडण्यात आल्याने संपूर्ण दुष्काळी पट्टा सुखावला आहे.

सध्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही वरुणराजाने उघडीप घेतली आहे, नीरा-देवघरच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस सुरु असून सर्व धरणे ८५ % पर्यंत भरली आहेत, वीर आणि धोम-बलकवडी मधून कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. वीरच्या लाभ क्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढत असून सध्या या क्षेत्रात आडसाली ऊसाच्या लागणी सुरु आहेत. आगामी २ महिन्यात साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु होणार आहेत. तालुक्यात सुमारे २० लाख मे. टनाहून अधिक ऊसाचे गाळप यावर्षी गळीत हंगामात होणार आहे. तालुक्यातील ४ पैकी १ साखर कारखाना यावर्षी बंद राहण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील संपूर्ण क्षेत्रातील ऊसाचे गाळप होण्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. वाढते ऊसाचे क्षेत्र गाळपासाठी पुरेशा सुविधा नसल्याने संकटात सापडण्याचा धोका असतानाच वाढत्या फळबाग क्षेत्रालाही प्रक्रिया आणि विक्रीची सक्षम व्यवस्था नसणे अडचणींचे ठरु शकते याचा विचार करुन तालुक्यात Cold Stoarej शीतगृह उभारण्याची आवश्यकता आहे. १/२ खाजगी शीतगृहे उभी राहिली असली तरी ती पुरेशी नाहीत, सहकार अथवा शासनाच्या पणन विभागाने येथे मोठी शीतगृहे उभारण्याची आवश्यकता आहे.

भाटघर धरण ८८.०६ % भरले असून तेथे पाऊस बंद झाला आहे. आज अखेर एकूण ४५०  मि. मी. पाऊस झाला आहे.

नीरा-देवघर धरण ८८.६१      %  भरले असून तेथे आज सकाळी संपलेल्या २४ तासात १२ मि. मी. पाऊस झाला असून आजअखेर एकूण १४१२ मि. मी. पाऊस झाला आहे.

वीर धरण ९०.३८ % भरले असून तेथे आजअखेर एकूण २३९ मि. मी.  पाऊस झाला आहे.

धोम-बलकवडी धरण ८४.६४ % भरले असून आजअखेर एकूण १८४३ मि. मी. पाऊस झाला आहे.