शहीद पोचीराम कांबळेंना स्मृती दिनानिमित्त अभिवादन


सातारा : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोचीराम कांबळे यांना 4 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी ता. नायगाव जि. नांदेड येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या पत्नी धोंडामाई आणि परिवाराच्या उपस्थित पार पडला. यावेळी प्रबुद्ध रंगभूमीचे निर्माते भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, डी. एस. नरसिंगे, लेखक सुरेश पाटोळे, कीर्तीपाल गायकवाड आणि विवेक घाडगे यांनी तत्कालिन घटनेला उजाळा देताना हा स्तंभ भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले.

प्रबुद्ध रंगभूमी आणि क्रांती थिएटर्सच्यावतीने राज्यात नाटकांचे 32 प्रयोग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सादर करून मिळालेल्या मानधनातून नामांतराच्या लढ्यातील नायकाचा स्तंभ पोचीराम कांबळे यांच्या गावात उभारला. याच ठिकाणी स्मारक बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नामांतराच्या लढयात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पहिली आहुती 4 ऑगस्ट 1978 रोजी पोचीराम कांबळे यांना द्यावी लागली. टेंभुर्णी गावातील कार्यक्रमात स्तंभाचे लोकार्पण करताना अमर गायकवाड म्हणाले,पोचीराम कांबळेंच्या बलिदानामुळे बहुजन चळवळीला गती मिळाली. टेंभुर्णीतील क्रांतीमुळे चळवळीतील आमदार-खासदार आणि मंत्री झाले. मात्र, गेल्या चाळीस वर्षात टेंभुर्णी दुर्लक्षित राहिली. 

कलाकार हा समाजाचा आरसा असतो, हे पुन्हा सिद्ध झाले. शहीद पोचीराम यांच्या पत्नी गेल्या चाळीस वर्षांपासून नवऱ्याच्या त्यागाला न्याय मिळणार कधी, या प्रतिक्षेत होत्या. कलाकारांनी निर्माण केलेला स्मृती स्तंभ पाहून त्या गहिवरल्या. भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड यांनी टेंभुर्णीत स्मारक बांधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नांदेड जिल्ह्यासह मुंबई, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे भागातील विविध सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.