जेलमध्ये बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न


सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील (जेल) बंदीवानाने बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शौचालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संशयित बंदीवानावर मेढा पोलिस ठाण्यात हाफमर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे.सागर किसन पार्टे (रा. केळघर, ता. जावली) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या बंदीवानाचे नाव आहे. कारागृह पोलिस दत्तात्रय ज्ञानदेव चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सागर पार्टे याच्याविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात हाफमर्डरचा गुन्हा दाखल असल्याने मेढा पोलिसांनी अटक केली.

 अटकेच्या कारवाईनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने सातारा कारागृहात (जेल) त्याची रवानगी करण्यात आली. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे बंदीवान सर्कल नंबर 3 च्या बाहेर होते. यातील सागर पार्टे हा लगतच्या शौचालयामध्ये गेला होता. सफाई कामगाराला शौचालयामध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यानेपोलिसांना सांगितले. कारागृह पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता सागर टाईलच्या फरशीने स्वत: हातावर वार करुन घेत होता.

ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला करुन तेथून ताब्यात घेतले. हातातून रक्‍त आल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, बंदीवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर कारागृहात खळबळ उडाली. दुपारी उशीरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सागर पार्टेवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

No comments

Powered by Blogger.