महाबळेश्‍वरमधील रस्त्यांची चाळण


महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून “खड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वरला सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून शहर व परिसरात धुक्‍यासोबतच महाबळेश्वरच्या चहुबाजूनी खड्ड्यांचेच साम्राज्य पसरले असल्याचे पाहावयास मिळत आहे. महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी “खड्डे’ पडले असून वाहनचालकांना या खाड्यांमधून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

दरवर्षीच हॉटेल साज, लिंगमळा परिसर, वेण्णालेक, मेटगुताड या रस्त्यांवर अनेक खड्डे पडत असून पाऊस दाट धुके व रात्रीच्या अंधारात अनेक अपघात देखील या मार्गावर होत आहेत. आंबेनळी घाटरस्ता, केळघर घाटरस्ता, तापोळा या तिन्हीही घाट रस्त्यांवर देखील अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. 

यासोबतच या तिन्ही घाटामध्ये अनेक ठिकाणी नादुरुस्त संरक्षक कठड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून येथील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या देखील रस्त्यांची तीच परिस्थिती असून क्षेत्र महाबळेश्वर रस्ता, ऑर्थरसीटकडे जाणारे रस्ते, पालिकेच्या हद्दीत असलेला ‘डचेस’ रस्ता तर खड्ड्यातच गेल्याचे चित्र आहे.पावसाळ्यामध्ये पर्यटकांच्या पसंतीच्या केट्‌स पॉईंट रस्त्यांची देखील अवस्था वाईट झाली आहे. महाबळेश्वर व परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडून डबकी तयार झाली असून या खड्ड्यांमधून मार्ग काढताना स्थानिकांसह पर्यटक व टॅक्‍सी व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे. वर्षानुवर्षे पावसाळ्यामध्ये या रस्त्याची हीच परिस्थिती असून गेले काही वर्ष या रस्त्यांची डागडुजीच होत नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये नाराजी असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महाबळेश्वरच्या शहरांतर्गत रस्त्यांची देखील अवस्था काहीशी अशीच झाली आहे सार्वजनिक बांधकाम खाते, वनविभाग तसेच नगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी तरी करण्यात यावी इतकी माफक अपेक्षा स्थानिकांसह पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.