विद्यार्थिनींनी गुंफले जवानांप्रती ऋणानुबंध


सातारा : राष्ट्रीय समितीच्या ‘एक राखी देशासाठी’ उपक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातून हजारो राख्या सैनिकांसाठी रवाना झाल्या आहेत. विद्यार्थीनींनी ‘एक राखी देशासाठी’ या उपक्रमातून राखी पाठवून सीमेवरील सैनिकांप्रती आपुलकीचे ऋणानुबंध जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. 

 देशभक्ती दाखवण्यासाठी राष्ट्रीय सण पुरेसे ठरतात. मात्र, यापलीकडे जाऊन देशाप्रती अहोरात्र झटणार्‍या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय समितीच्यावतीने ‘एक राखी देशासाठी’ उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमास सातारा येथील विद्यार्थीनींकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असणार्‍या भारतीय जवानांप्रती बंधूभाव प्रकट करण्याच्या उददेशाने शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी एक राखी देशासाठी हा अभिनव उपक्रम राबवला आहे.

दिवस-रात्रं एक करुन देशाच्या संरक्षाणासाठी सीमेवर तैनात असलेल्या व स्वत:च्या जीवाची बाजी लावण्यास मागे पुढे न पाहणार्‍या सैनिकांप्रती आपल्याला काय वाटते हे चार ओळीत शब्दबद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीमेवर आपले सैनिक देशाचे रक्षण करीत असल्याने आपण स्वाभिमानाने जगत आहोत. देशासाठी एकजूट राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. देशाच्या सिमेवर प्राणपणाने लढणार्‍या भारतीय सैनिकांना राखीच्या बंधनातून ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. देशाच्या सिमांच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. शत्रुशी दोन हात करताना सैनिकांना प्रसंगी वीर मरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, त्यांचे शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तुस्थीती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवायला हवी.

एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम देशभक्ती आणि देशबंधुत्वाचा संदेश शैक्षणिक जगामध्ये पोहचवला जात आहे. सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण होतात, याचे भान नसते. ते आपल्या कर्तव्याशी बांधील असतात. देशवासियांनी पाठवलेली एक राखी देशवासिय त्यांच्या पाठीशी आहेत ही भावना सैनिकांमध्ये रूजवू शकते. एका राखीने प्रत्येक सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी ‘एक राखी देशासाठी’ हा उपक्रम देत असून हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालये व महिला संघटनांमूधन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतिक असलेले रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधून जवानांसाठी हजारो राख्या पाठवून देशसीमेवरील जवानांप्रती आपूलकीचे ऋणानुबंध गुंफण्याचे संस्कार विद्यार्थी मनावर रुजवले जात आहेत.

No comments

Powered by Blogger.