पतंगाच्या मांजामुळे एकाचा चेहरा चिरला


वाखरी : पतंगाच्या चायना मांजाने कापल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या चेहर्‍यावर 15 टाके पडले असून ही घटना फलटण-आसू रोडवर राजाळेजवळ रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. दुचाकीचा वेग कमी असल्यामुळेच जिवावरचे चेहर्‍यावर बेतले आहे.सुरेश संभाजी जगताप (वय 59, रा. गोखळी, ता. फलटण) असे मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. सुरेश हे रविवारी रात्री कामावरून घराकडे दुचाकीवरून जात असताना राजाळेनजीक ननावरे वस्तीजवळ चायना मांजा कापल्याने ते गंभीर जखमी झाले. जिल्ह्यातील दोन दिवसांमधील अशी दुसरी घटना आहे. जखमी सुरेश यांना फलटण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना संचलित निरा व्हॅलीमध्ये सुरेश जगताप कार्यरत आहेत.

दरम्यान, गतवर्षी चायनीज मांजा कापल्याने दोन-तीन जणांचा बळी गेला होता. तद्दनंतर फलटण शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदारांनी चायनीज मांजा विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा यावर्षी चायनीज मांजाची विक्री सुरू झाल्याने दुर्घटना घडून येत आहेत. प्रशासनाने त्वरित कारवाई करून चायनीज मांजावर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.