सर्जापूरला उरला नाही कुणी वाली


पाचवड :जावली तालुक्‍यात असलेल्या सर्जापूर गावाकडे नेहमीच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली आहे. मुळातच लोकसंख्या कमी असल्याने गावाकडे राजकीय व्यक्तींनी सुरुवातीपासून फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या वाट्याला गैरसोयीच आल्या आहेत. सध्या गावातील अंतर्गत रस्ता तसेच गावात जाण्यासाठी असलेल्या कळंभे ते सर्जापूर दरम्यानचा पुल, सर्जापूर ते कुडाळ रस्ता, सर्जापूर ते उडतारे रस्ता या सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने सर्जापूरला कुणी वाली उरला आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सर्जापूर हे जावली तालुक्‍याच्या सीमारेषेवरील शेवटचे गाव. गावातील लोकसंख्येचे प्रमाणही तसे कमीच आहे. परंतु, बागायती क्षेत्र असल्याने गावात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न शेतकरी घेतात. मात्र, भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जायचे म्हटल्यास वाहनांची नेहमीच अडचण असते. त्यातच रस्त्याची दुरुवस्था असल्याने वाहनधारकही ज्यादा भाडे मागतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागते.

सर्जापूर ते कळंभे या दरम्यान कुडाळी नदी असून या नदीवर पुल आहे. या पुलाची सध्याची अवस्ता अतिशय दयनीय झाले आहे. मात्र, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदार संघात असलेल्या सर्जापूर गावाला त्यांनीही नेहमीच सापत्नपणाची वागणून दिली आहे. सध्या पुलाला दुरुस्तीची आवश्‍यकता आहे. मात्र कुणी वालीच उरला नसल्याने पुल दुरुस्त होणार की? ढासळल्यावरच त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देणार असा सवाल येथील ग्रामस्थांमधून होऊ लागला आहे.

तसेच सर्जापूर ते कुडाळ रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे. रस्त्यावर पाच ते सहा फुट लांबीचे आणि दीड दोन फुट खोलीचे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्ताही दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात खचला आहे. मात्र, त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. या रस्त्याने येथील शेतकऱ्यांच्या उसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अनेकवेळा या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या पलटी होत असतात. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

दरम्यान, सर्जापूर गावाला महामार्गाला जोडणारा सर्जापूर ते उडतारे या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. तरीही या खड्ड्यामध्ये साधा मुरुम भरण्याचे काम प्रशासनाकडून झालेले नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

No comments

Powered by Blogger.