नागठाणे परिसरात चोरी-छुपे “गुटखा विक्री’


नागठाणे : सातारा तालुक्‍यातील नागठाणेसह परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची “चोरी-छुपे’ विक्री होत आहे. महाराष्ट्रच्या सीमावर्ती भागातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात या भागात गुटख्याची आवक येथीलच काही बड्या व्यावसायिकांकडून होत असून याचे वितरणही भागातील छोट्या व्यवसायिकांकडे सहजरित्या होत आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या विभागाच्या एकंदर कारभाराबाबत परिसरातून शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

गुटख्याच्या अतीवापरामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली. पण, या बंदीचा गैरफायदा नागठाणे भागातील काही व्यावसायिकांनी घेतला आहे. जिल्ह्यातून जाणारा पुणे बेंगलोर महामार्ग, विजापुर मार्गाने मोठ्या प्रमाणात नागठाणे परिसरातील गावांमधून गुटख्याचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. या अवैध व्यवसायात काही मोठे व्यापारी तयार झाले आहेत. त्यांच्यामार्फ़त ग्रामीण भागात छोटे मोठे दुकानदार, पानपट्टीधारक यांना सहजरित्या गुटखा उपलब्ध केला जात असून तो ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी चोरी-छुपे विकला जात आहे.

राज्य सरकारच्या गुटखा बंदीला काही अंशी यश आले आहे. मात्र, बऱ्याच अवैध धंद्यात आता अवैध गुटखा विक्रीच्या धंद्याची भर पडल्याची चर्चा आहे. शिवाय आता तर चक्क खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केला जात आहे. गुटख्यावर असलेली बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. यामुळे या भागातील तरुण पिढी गुटख्याच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. 

बोरगाव पोलिसांकडून या धंद्यावर जरी कारवाई केली जात असली तरी अन्न व औषध प्रशासनाकडूनही त्यांना सहकार्य मिळणे तेवढेच अपेक्षित असताना ते मिळत नाही. त्याचप्रमाणे अन्न व औषध विभागाकडून गुटख्याच्या विरोधात अशी कोणतीच मोहिमही राबविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विभागाच्या एकंदर कारभाराविषयी येथील जनतेत चर्चा सुरू असून अन्न औषध प्रशासनाने गांधारीची भूमिका न घेता अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.