Your Own Digital Platform

कोकाटेंच्या केसाला धक्‍का लागल्यास महाराष्ट्र पेटेल


औंध : इतिहास संशोधक व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ते श्रीमंत कोकाटे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिला. दरम्यान मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.औंध येथे आयोजित मराठा सेवा संघाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे खटाव तालुका समन्वयक बाबा शिंदे, हणमंतराव शिंदे, डॉ. विवेक देशमुख, राजाभाऊ देशमुख, रमेश चव्हाण, चंद्रकांत पवार, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, भिमराव भोसले, उत्तम माने, बाळासाहेब पोळ, धनाजी गोडसे आदी उपस्थित होते.

खेडेकर पुढे म्हणाले, राज्यामध्ये एका ठराविक विचाराने प्रेरित झालेल्या संघटनेकडून विचारवंतांच्या हत्या घडवल्या जात आहेत. त्यामध्ये अजूनही काही नावे संशयित आरोपींच्या कागदपत्रांमध्ये समोर आली आहेत. श्रीमंत कोकाटेंचे नावही त्यामध्ये असल्याची माहिती पुढे येत आहे. शासनाने आता अशा संघटनांवर बंदी घालण्याची योग्य वेळ आली आहे. अशा प्रवृतींचा लाड न करता ठोस कारवाई करणे गरजेचे बनले आहे. श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जरी धक्का लागला तर कोणाची खैर केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर शासनाने मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत न ठेवता त्वरित ओबीसी आरक्षण लागू करून मराठा समाजास न्याय द्यावा. यासाठी 19 टक्के आरक्षणाची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी मराठा समाजातील युवक, कार्यकर्ते यांनी यापुढील आंदोलन संयमाने करावीत, असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्याचा अभ्यास करावा, असे सांगताना त्यांनी ब्रिटिशकाळापासून तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या आरक्षणाचे दाखले व माहिती दिली. कालेलकर व मंडल आयोगांच्या शिफारशींची माहिती देवून खेडेकर यांनी सर्व समाज बांधवांनी एकोप्याने राहून सामाजिक उन्नती व राष्ट्राची प्रगती साधावी, असे आवाहन केले. यावेळी हणमंतराव शिंदे, राजाभाऊ देशमुख, रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. खटाव, कोरेगाव, कराड तसेच अन्य तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, युवक, मराठा बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक जयवंत खराडे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी केले.