आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

नगरसेवक विशाल जाधवांवर कारवाई करा


सातारा : सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातील कॉम्पॅक्टर वाहन साविआतील काही नगरसेवकांची वाहने ठेक्यावर घेण्यासाठी जाणीवपूर्वक बंद पाडले जात आहे. सदरबझारमधील साविआचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या जाचास कंटाळून घंटागाडीचालकाने विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत सातारा पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला. दरम्यान, मंगळवार पेठेतील वाचनालयातील लाखोंची पुस्तके, फर्निचर गायब असून त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवक लेवे यांनी केला.सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण छत्रपती शिवाजी सभागृहात सभा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

एनवेळच्या विषयांवरुन सभा गाजली. मंगळवार पेठेत वाचनालयाच्या इमारतीत सुरु केलेल्या वाचनालयातील पुस्तके कुठे आहेत? त्यातील फर्निचर कुठे गेले? नगरपालिका तसेच संबंधित संस्था यांच्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे करार करण्यात आला. ही संस्था कुणाची आहे? असा सवाल नगरसेवक वसंत लेवे यांनी केला. भांडारविभागप्रमुख देविदास चव्हाण खुलासा करताना म्हणाले, संबंधित 8 लाखांची पुस्तके तेथील पतसंस्थेत आहेत. पुस्तके पतसंस्थेत गेली कशी? ती संस्था कुणाची आहे? असे विचारत लेवे यांनी दबाव आणला. त्यावेळी चव्हाण यांनी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांचे नाव घेतले. बस्स मला एवढेच पाहिजे.

आता मी बघतोच, असे सांगत लेवे यांनी कदम यांचे नाव वदवून घेतल्याने सभागृहात खळबळ उडाली. नगरपालिकेची इमारत लोकांची सेवा करण्यासाठी दिली जात असताना पुस्तके मात्र मेवा खाण्यासाठी दिली. त्यासाठीचे संमतीपत्र खोटे व बोगस आहे. नगरपालिकेची फसवणूक केली असून संबंधितावर फौजदारी कारवाई करावी. नविआच्या लीना गोरे, अविनाश कदम, सचिन सारस, भाग्यवंत कुंभार, अंजली माने यांनी त्यांचा वॉर्ड फंड पुस्तक खरेदीसाठी दिला. त्यासाठी काहीजणांनी दिलेल्या पत्रांवर तारखा तसेच बारनिशीची पोहोच नाही. या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप लेवे यांनी केला.

अशोक मोने म्हणाले, संबंधित वाचनालय ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येणार होते. मात्र, नगरपालिकेने वाचनालयाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वाचनालयाची दुरवस्था झाली. नगरसेवकांनी दिलेल्या फंडातून पुस्तके घेण्यात आली असून हे वाचनालय ट्रस्टच्या माध्यमातून चालवावे, अशी संबंधित नगरसेवकांची मागणी होती. दोन वर्षांनी हा विषय सभागृहात आला. कायदेशीर प्रक्रिया पार न पाडल्याने प्रशासनाचा हा गलथानपणा आहे. लेवे यांनी मोने यांच्या मुद्यांचा इन्कार केला. ते म्हणाले, नेत्यांचे समाधान होईल असे बोलू नका.

नगरसेविका आशा पंडित म्हणाल्या, वाचनालयाचा विषय हे भ्रष्टाचाराच्या नगाचे एक टोक आहे. अशा अनेक भानगडी नगरपालिकेत काही नगरसेवकांनी स्वार्थासाठी करुन ठेवल्या आहेत. त्या बाहेर आल्या तर बर्‍याच नगरसेवकांना आत जावे लागेल. करंजे एमआयडीसी प्रकरणी प्रशासनाने कोर्टात म्हणणे दिले आहे. चुकीच्या पध्दतीने भूखंड वाटप झाले. अनेकांच्या मुदती संपून गेल्या असून त्याठिकाणी बेकायदा बांधकामे झाली. काहीजणांनी पोटभाडेकरु ठेवले. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तरीसुध्दा कारवाई झाल्याचे कोर्टात सांगितले जाते. सभागृहात ठराव होतात, पण, चुकीचे प्रकरण कोर्टात गेले तर त्यासोबतची कागदपत्रे गायब होतात. मनोमिलनाच्या कारभारात एक नगरसेवक तर ‘मंजूर’च्या घोषात चर्चा न करता विषयांना मंजुर्‍या मिळवायचा.

मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, अक्षरधारा, पुणे यांच्याकडून सुमारे 8 लाख रुपयांची 5126 पुस्तके खरेदी करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सीओंनी सांगितले. यावेळी सुहास राजेशिर्के यांनी पुस्तकांची यादी वाचण्याची मागणी केली. ‘उंची कशी वाढवावी?’ नावाचे पुस्तक त्यामध्ये आहे का? या प्रकरणामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. मनोमीलनात अधिकार्‍यांची गचांडी पकडून काम केले, अशी टीका लेवे यांनी केली.

नगरसेवक अ‍ॅड. डी. जी बनकर म्हणाले, पूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर कशा करता येतील हे पाहिजे पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमावी. दोन पत्रकार, अधिकारी, विरोधी पक्ष व पदाधिकारी मिळून समिती नेमावी, अशी मागणी लेवे यांनी केली. त्यास सिध्दी पवार यांनी विरोध केला. सभागृह नेते निशांत पाटील यांनी घरकूल योजनेतील निकृष्ट कामावर टीका केली.

अमोल मोहिते म्हणाले, शहराच्या स्वच्छतेचा ठेका साशा कंपनीला दिला. पण शहरात कचर्‍याची समस्या आहेच. कुणाची तरी मशिनरी लावण्यासाठी कॉम्पॅक्टर सतत बंद पाडला जातोय का? दरम्यानच्या काळात कुणाचा डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर लावला जातोय, याची माहिती द्या. कचर्‍याची जबाबदारी साशा कंपनीची असल्याने त्यावर नगरपालिकेने खर्च करु नये.

अशोक मोने म्हणाले, साविआ नगरसेवकाच्या जाचास कंटाळून एका घंटागाडीचालकाने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचार घेत असलेल्या घंटागाडीचालकाची व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगत मोने यांनी सभागृहात भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केल्याने खळबळ उडाली. सातारा विकास आघाडीने नगरसेवक विशाल जाधव यांच्यावर कारवाई करावी. ही कारवाई न केल्यास भ्रष्टाचाराला साविआचा पाठिंबा असून सातारकर त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असे सांगितले. अ‍ॅड. बनकर म्हणाले, ही बाब न्यायप्रविष्ट आहे. जोपर्यंत आरोप शाबित होत नाहीत, तोपर्यंत जाधव यांच्यावर आघाडीकडून कारवाई केली जाणार नाही. रेकॉर्डिंग कसे केले जाते आम्हाला माहित आहे. त्यामध्ये आम्ही मास्टर आहोत. नागरिकांच्या हितासाठी नगरसेवकांना घंटागाडीचालकांना बोलावे लागते, असे लता पवार यांनी सांगितले. प्रभागातील स्वच्छता झाली पाहिजे. कर्मचारी दुपारी लवकर घरी जातात. काहीजण सकाळपासूनच बाहेर असतात. त्यामुळे नगरपालिकेत येवूनही कामे होत नसल्याचे स्नेहा नलावडे यांनी सांगितले.