‘गावाकडच्या गोष्टी’ जगभर पोहोचल्या


तारळे : आव्या,संत्या,सुरकी व बापू या पात्रांनी यु ट्यूबवर कोरीपाटी प्रॉडक्शनच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेबासिरीजमधून धुमाकूळ घातला आहे. डोंगरावरील एका गावात तयार होत असलेली पंचवीस भागांची वेबसिरीज आठ महिन्याच्या कालावधीत जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचली आहे.जोहान्सबर्ग(आफ्रीका) येथील मराठा बांधवांनीही त्यांना निमंत्रण दिले आहे.‘गावाकडच्या गोष्टी’ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वश्रेष्ठ मराठी वेबसिरीज म्हणून नावारूपाला आली असून बावन्नजनांच्या टीमने यासाठी अपार मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक नितीन पवार यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

 शालेय जीवनापासून सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले गुण दाखवणारा त्यानंतर कॉलेजमध्ये एकांकिकांचे दिग्दर्शन व लेखन करणारा वेखंडवाडीसारख्या छोट्या गावातील नितीन पवार हा तरुण याचे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी ‘बळीराजा’, ‘सावर रे’, ‘ही वाट वळणाची’ यासह तेरा मराठी मालिकांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना शहरात राहून आभिनय क्षेत्रात काम करणे तितके सोपे व न परवडणारे होते. मग मुंबई सोडून गावातील कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्याने मुंबईला रामराम करण्याचा निर्णय घेतला. मग त्याला के. टी. पवार (मालिकेतील बापू), संतोष राजेमहाडीक (संत्या), आविनाश पवार(अव्या) व कॅमेरामन म्हणून उमेश तुपारे यासह अनेक कलाकार व मित्रमंडळींची साथ मिळाली.आणि मग ‘कोरी पाटी’ प्रोडक्शन व ‘गावाकडच्या गोष्टी’ नावाची वेबसिरीज सुरु झाली.पण महत्त्वाची अर्थिक अडचण दूर करण्यासाठी निर्माते सुदाम पवार यांनी सहकार्य केले आणि पंचवीस भागांचा प्रवास सुरु झाला.

ज्या गावात सहजासहजी वाहन पोहचत नाही असे कडवे विभागातील केळेवाडी (वरची)येथे सिरीजचा नारळ फूटला.शुटींग म्हटले कि अनेक ठिकाणी महागड्या साधनसामग्री,इतर लवाजमा बघायला मिळतो.पण नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करुन पंचवीस मालिकांचा अखंड प्रवास झाला आहे.अर्थिक ताळमेळ घालत तारळे विभागाचे सौंदर्य सर्वदूर पोहचविण्यासाठी विभागातील जळव,मरळोशी,बांबवडे ,व तारळे येथे काही भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी सहजासहजी पोहचता येत नाही अशा डोंगरावर असणार्‍या केळेवाडी गावातच अनेक भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.पंचवीस भागासाठी जवळपास बावन्न जणांच्या टीमने अल्प मानधनात दहा महीने आपार मेहनत घेतली आहे.पहिल्या पंचवीस भागांचे यशस्वी चित्रीकरण झाल्यावर आता नवीन पंचवीस भागांची वेबसिरीज पर्व दुसरे तेरा ऑगष्ट पासून सुरू होत आहे.

कलाकारांना सामाजिक कार्याचीही जाणीव असल्याने तळदेव (मायणी) ता.जावळी येथे प्रत्येक घरात सोलर बसवून गाव प्रकाशमान केले.केळेवाडी (वरची)येथील जिल्हा परिषद शाळेतील पहीली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दत्तक घेत शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे.त्याचबरोबर पाणी फौंडेशनसाठी चळवळीत सहभागी होत अनेक गावातून श्रमदान केले आहे.

No comments

Powered by Blogger.