Your Own Digital Platform

संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुरोगामी विचार रुजवण्याचे कार्य : कोकाटे


कुडाळ : संभाजी ब्रिगेड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारांची संघटना आहे. याच्या माध्यमातून पुरोगामी विचारधारा रुजवण्याचे कार्य सुरु आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केले.मेढा येथील एस.एस.पार्टे मंगल कार्यालय येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांची जावली, महाबळेश्‍वर कार्यकारणी निवड आणि संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश कोकण अध्यक्ष सचिन सावंत- देसाई, सातारा जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, प्रदिप कणसे, वागदरे गावचे सरपंच कृष्णा शेलार आदी मान्यवर उपस्थित होतेे.

या संवाद मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्ते यांना संभाजी ब्रिगेडची संकल्पना समजावून देण्यात आली. एकमताने वागदरे गावचे सरपंच कृष्णा शेलार यांची जावली महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नियुुकती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र श्रीमंत कोकाटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदिप कणसे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सावंत यांनी केले. आभार ज्योतीराम वाघ यांनी मानले. कार्यक्रमास जावली, महाबळेश्‍वर, सातारा आदी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.