गोंदवल्यासह इतर गावांचा पाणी प्रश्न सोडवू : आ. जयकुमार गोरे


गोंदवले : उरमोडीचे पाणी येत्या पंधरा दिवसात पिंगळीच्या कालव्याद्वारे ओढ्यात सोडून गोंदवल्यासह इतर गावांचा पाणी प्रश्न सोडवू, असा शब्द आ. जयकुमार गोरे यांनी वाघमोडेवाडी येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.

उरमोडी योजनेतून पिंगळी तलावात पाणी सोडण्यासाठी पाटाची कामे सुरू आहेत. या पाटातून पिंगळी खुर्द व वाघमोडेवाडी ओढ्यात लवकरात लवकर पाणी सोडावे व शेतीसह जनावरांसाठीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी वाघमोडेवाडीत शेतकऱ्यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. शिवाजीराव वाघमोडे, अजित पोळ, श्रीकृष्ण कट्टे, मोहनराव शेलार, आनंदराव भोसले, विठ्ठलराव काळे, हणमंतराव जाधव, महादेव अवघडे, तसेच गोंदवले बुद्रुक व खुर्द, वाघमोडेवाडी, पिंगळी खुर्द, किरकसाल येथील शेतकरी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, तालुक्‍यातील अनेक पिढ्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी 30 वर्षांपूर्वीच प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. मी मात्र सर्वस्व पणाला लावून उरमोडीचे पाणी माणमध्ये आणले. विरोधकांनी याबाबत केवळ राजकारण केले. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले. गावगावात साखळी बंधारे झाल्याने पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदत झाली आहे. परंतु, हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. गोरे यांनी अनिल देसाई व प्रभाकर देशमुख यांच्यावरही शरसंधान केले. आमचे सरकार असून पाणी आम्हीच आणणार असे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते सांगत असले तरी पाणी फक्त जयकुमारनेच आणले असल्याने वरकुट्याच्या पिपाणीनेही पाणीपूजन करून पाणी आणल्याचे समाधान करून घेतले, अशी टिका त्यांनी केली. तर उच्च पदस्थ अधिकारी असताना सहज विकासकामे करणे शक्‍य होते, मात्र निवृत्तीनंतर माणचा खोटा कळवळा आला असल्याची टीका प्रभाकर देशमुख यांच्यावर केली.

No comments

Powered by Blogger.