Your Own Digital Platform

निवडणुकीपुर्वी मतदारांना हरकती व नोंदणीसाठी अखेरची संधी


सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच नवीन मतदारांना नोंदणी करण्याची अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून त्या कालावधीमध्ये यादीतील नाव, हरकती व नूतन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला. दि.1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ती सर्व तहसिल कार्यालयात पाहता येणार आहे. तसेच त्यानंत दि.1 सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोंबर कालालधीत मतदारांना हरकती दाखल करता येणार आहेत. दि.30 नोव्हेंबर रोजी हरकती निकालात काढण्यात येणार असून अंतिम यादी 4 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच या कालावधीत ज्या मतदारांचे यादीत नाव नाही त्यांना तसेच 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणार आहे त्या युवा मतदारांना दरम्यानच्या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी तहसिल व प्रांत कार्यालयात समक्ष अथवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने देखील करता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केल्यास बीएलओ हा आपल्या पत्त्यावर भेट देवून कागदपत्रांची पाहणी करेल. तसेच या कार्यक्रमामध्ये दिव्यांग, महिला व तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी करण्यावर भर दिला जाणार असून त्यासाठी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. मतदारांची संख्या वाढावी यासाठी राजकीय पक्षांसोबत प्रशासन समन्वय साधत असून पक्षांनी ही पुढाकार घेवून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

दरम्यान, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात अत्तापर्यंत एकूण मतदारांची संख्या 23 लाख 79 हजार 161 इतकी असून त्यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 21 लाख 179 तर महिला मतदारांची संख्या 11 लाख 57 लाख 982 इतकी आहे. फलटण विधानसीा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 62 हजार 182 तर महिला मतदार 1 लाख 49 हजार 691, वाई मतदार संघात पुरूष मतदार 1 लाख 60 हजार 656 तर महिला मतदार 1 लाख 56 हजार 112, कोरेगाव मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 46 हजार 63 तर महिला मतदार 1 लाख 36 हजार 549, माण मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 66 हजार 30 तर महिला मतदार 1 लाख 55 हजार 188, कराड उत्तर मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 41 हजार 202 तर महिला मतदार 1 लाख 32 हजार 614 व तृतीय पंथीय 1 , कराड दक्षिण मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 41 हजार 144 तर महिला मतदार 1 लाख 30 हजार 163, पाटण मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 44 हजार 446 तर महिला मतदार 1 लाख 40 हजार 980 व तृतीय पंथीय 1 आणि सातारा विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 59 हजार 456 तर महिला मतदार 1 लाख 56 हजार 685 तर तृतीय पंथीय मतदार 9 इतके असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्याच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आपणाला तयार राहण्याच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर येत्या काळात निवडणूका झाल्या तर प्रशासन तयार आहे का या प्रश्‍नावर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सदैव तयारच असतो असे उत्तर दिले. तसेच इव्हीएम मशिनव्दारे निवडणूक ही पुर्णपणे पारदर्शी होत असून शंका घेणे योग्य नसल्याचे मत निवडणूक उपजिल्हाधिकारी पुनम मेहता यांनी व्यक्त केले.