Your Own Digital Platform

वाया जाणार्‍या पाण्यावर वीज निर्मिती


पाटण : कोयना धरणात यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणातून लवकर पाणी सोडण्यात आले. या विनावापर सोडण्यात येणार्‍या पाण्याचा फायदा होण्याऐवजी पूर्वेकडील विभागांना तोटाच सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून वाया जाणार्‍या पाण्याचा अधिकाधिक वापर करून घेण्यात सिंचन विभागाला पहिल्या टप्प्यात यश आले आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट वीजनिर्मिती झालीच शिवाय राज्याचा महसुलही वाढला. कोयना धरणातील पाण्यावर पश्‍चिमेकडील पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा या तीन वीजनिर्मिती प्रकल्पातून वीजनिर्मिती होते. 

वर्षभरासाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात येते. या पाणी वापराचे सर्वाधिकार वीज कंपनीला आहेत. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यासाठी ऑक्टोबर महिन्यानंतर 22 टीएमसी व गरजेनुसार ज्यादा पाणी सोडण्याची तरतूद आहे. धरणात ज्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त पाणी येते त्यावेळी धरणाचे सहा वक्री दरवाजे उचलून त्यातून विनावापर पाणी पूर्वेकडे सोडण्यात येते. मात्र या पाण्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होत नाही. ते पाणी सांगलीमार्गे कर्नाटकमधील अलमट्टी धरणात जाते व त्याचा कर्नाटक व पुढे आंध्र प्रदेश राज्यांना फायदा होतो. या वर्षी धरणातून विनावापर 12.65 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

धरण पायथा वीजगृहातून जास्तीत जास्त पाणी सोडून त्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत सिंचनासाठी 1.72 तर 17 जुलैपासून पूर काळात 2.42 अशा एकूण 4.14 टीएमसी पाण्यावर येथून 17.431 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षी येथून केवळ 6.466 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली होती. तर पूर्वेकडील 4.14 व पश्‍चिमेकडील 4.39 अशा एकूण 8.53 टीएमसी पाण्यावर एकूण 270.223 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षी ही वीजनिर्मिती 239.859 दशलक्ष युनिट होती. म्हणजेच चालूवर्षी ज्यादा 30.164 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

कोयना धरणात सध्या अपेक्षेपेक्षाही जास्त पाणीसाठा आहे. आवश्यक कोठ्यापेक्षा आठ फुटांनी ज्यादा पाणी आहे. वाया जाणार्‍या पाण्याचा सकारात्मक वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाऊस व धरणात येणार्‍या पाण्याचा विचार करून पायथा वीजगृह सुरू करण्यात येणार आहे. - कुमार पाटील कार्यकारी अभियंता ,कोयना सिंचन विभाग.