कमी पटाच्या शाळांसाठी आता नवा ‘संकल्प’


सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीच्या कमी पटाच्या 8 ते 10 शाळा एकत्र करून संकल्प शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांची भेट घेण्यात येणार आहे.

समितीच्या सभागृहात शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीस समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. पाच किलोमीटरच्या आतील कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळा एकत्रीत करून संकल्प शाळा निर्माण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाटण, जावली, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्याची व्यवस्था शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी एकत्रित केल्यास सुमारे 90 हून अधिक पट होण्याची शक्यता आहे.

तसेच शिक्षकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही चांगले मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. याबाबत दि. 5 सप्टेंबर रोजी भिलार येथे होणार्‍या शिक्षक दिन कार्यक्रमावेळी शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांची भेट घेऊन संकल्प शाळेचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात रोल मॉडेल म्हणून शिक्षण विभागाने संकल्प शाळेसाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मगाणी करण्यात येणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले. संकल्प शाळेमुळे शालाबाह्य मुले राहणार नाहीत.प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. त्यानंतर राजेश पवार यांनी प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत होण्यासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. दर महिन्याच्या 20 तारखेला प्रत्येक पंचायत समितीकडून शिक्षकांची पगार बिले आली पाहिजेत अशा सूचनाही पवार यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या.

प्रतापसिंह हायस्कूलच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी हायस्कूलमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक नेमण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच विद्यार्थी पटसंख्या कमी असून ती वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना राजेश पवार यांनी दिल्या.

दरम्यान, अर्थ समितीची सभा राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत जिल्हा परिषद मुद्रणालयासंदर्भात चर्चा करण्यात आली. नव्याने बसवण्यात येणार्‍या फोरकलर मशिनसदंर्भात शासकीय मुद्रणालयातील तंत्रज्ञांनी भेट दिली असून त्याचा अहवाल आल्यानंतर मशीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या कामकाजात सुसत्रता येण्यासाठी सर्व विभाग ऑनलाईन जोडले जावेत यासाठी सॉफ्टवेअर खरेदीसाठी तांत्रीक मान्यता घेण्यात आली असून लवकरच सर्व विभागाचे कामकाज ऑनलाईन होणार असल्याची माहिती राजेश पवार यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.