Your Own Digital Platform

पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर
वाई :  राज्यभरासह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात महिनभर जोरदार पाऊस पडला. पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, यंदा वाई तालुक्‍यात म्हणावा तितका पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जेमतेप पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकेही आता चांगली उगवली आहेत. मात्र, सध्या तालुक्‍यात कडक उन पडत असल्याने उगवलेली पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मात्र, धोम धरणाच्या परिसरात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने धोम धरण अद्यापही भरलेले नाही. शिवाय बलकवडी धरणातून होणारा विसर्गही बंद झाला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

सध्या तालुक्‍यातील सर्रास पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिकेही चांगली उगवून आली आहेत. त्यामुळे बळीराजा कोळपणीच्या कामात मग्न झाला आहे.

वाई तालुक्‍याशिवाय पाचगणी, महाबळेश्वरला पावसाची थोडी रिपरिप चालू असली तरीही संपूर्ण तालुका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नागेवाडी धरण व धोम धरण क्षेत्रात आजही पुरेसा पाऊस पडत नाही. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे अनेक वर्षांपासून सिद्ध झाले आहे. थोड्या दिवसात दमदार पाऊस पडला नाही तर हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. वाईच्या पश्‍चिम भागात पावसाला जोर नसल्याने भात लागवड वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.