कुडाळमध्ये बैलगाडी मोर्चा


कुडाळ : मेढा (ता. जावळी) येथे मराठा आरक्षणासाठी महाबळेश्वर-मेढा-सातारा रोडवर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोनल केले. यावेळी आंदोलकांनी मुंडन करत सरकारचे श्राद्ध घातले. दरम्यान, जावली तालुक्‍यात सकल मराठा क्रांती मोर्चाने बैलगाडी मोर्चा काढून शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी “एक मराठा लाख मराठा’च्या घोषणेने मेढा, कुडाळ, केळघर, सायगाव, आनेवाडीसह परिसर दणाणून गेला.

जावली तालुक्‍यातील कुडाळ, करहर, हुमगाव, बामणोली, सरताळे, सायगाव भागातून शेकडो मराठा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. दरम्यान तहसिलदार यांना मराठा भगिनींनी निवेदन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे (रा. कानडगाव, ता. गंगापूर) या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली होती. यासह एकूण 30 जणांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. 

या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जावलीत मराठा बांधवांनी कुडाळ येथे आज भव्य बैलगाडी मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले. मराठा मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जावली तालुक्‍यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सकाळपासूनच कुडाळ, मेढा, केरघळ, सायगावसह ग्रामीण भागात बाजारपेठेत शुकशुकाट होता. कुडाळमध्ये 100 टक्के बंद पाळण्यात आला.

No comments

Powered by Blogger.