आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

हजार वर्षापूर्वीचे प्रकाशचित्र पाहण्याची लाभली संधी


सातारा : जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने येथील चौकवाले फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफीचा इतिहास मांडण्यात आला.

यावेळी एक हजार वर्षांपूर्वीचे प्रकाशचित्र कसे होते हे पाहण्याची दुर्मिळ संधी सातारकरांना लाभली. कॅमेरा बस्क्युराची एक प्रतिकृतीच चौकवले स्टुडिओत बनविण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वतःच्या कलेक्शन मधील अँटिक ग्लास निगेटीव्हज्, 1928 चा एम.एफ.एफ. कॅमेरा, जुने टी.एल.आर व एस एल.आर. कॅमेरे फोटोग्राफीप्रेमींना प्रत्यक्ष हाताळता आले.

यावेळी जगातील पहिला फोटो नाईस् फोर नाइप्से यांनी कसा काढला. तसेच पहिला सेल्फी रॉबर्ट कॉर्निलीस यांनी काढला होता याची माहिती देण्यात आली. मोबाईल स्टुडिओ कसा असतो विना कॉम्प्युटरचे फोटो एडिटिंग व मिक्सींग कसे केले जाते, त्याबाबत कोणतीे कौशल्ये आवश्यक आहेत. तसेच व्हिडीओ शुटिंगची सुरुवात पहिल्यांदा कधी झाली, लार्ज फॉरमॅट फिल्म ते सर्वसामान्यांसाठीचा कॅमेरा व अलीकडच्या काळातील छोट्या सेंन्सरचा मोबाईल कॅमेरा ते पुन्हा लार्ज फॉरमट सेंसरचा डी. एस.एल.आर. कॅमेरा याची कुतुहलजनक माहिती योगेश चौकवाले यांनी यावेळी दिली.

फोटोग्राफी म्हणजे कलाकाराने तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यक्त केलेली कला असून तंत्रज्ञानाच्या हव्यासात आपल्यातला कलाकार हरवता कामा नये, असे मत कार्यक्रम प्रसंगी प्रसन्न देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच प्रकाश चौकवाले यांनी फोटोग्राफी संबंधित आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या.चौकवाले स्टुडिओत कॅमेरा हाताळताना, सेल्फी घेताना एक वेगळाच आनंद सातारकरांना होत होता. या कार्यक्रमासाठी निलेश शिंदे, जयश्री चौकवाले व सेजल चौकवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.