Your Own Digital Platform

‘आता तरी बरस रे बाबा’; शेतकर्‍यांची आर्त हाक


पिंपोडे बुद्रुक : मान्सूनच्या पावसाचे अखेरीचे दिवस उरले आहेत. मात्र तरीही उत्तर कोरेगाव तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालाच नाही. ओढे, नद्या-नाले, पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. खरिपाच्या हंगामाला जीवदान मिळाले असले तरी अपुर्‍या पावसामुळे भविष्यात दुष्काळी परिस्थिती ओढवण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे ‘आता तरी बरस की रे बाबा’, अशी आर्त हाक शेतकरी मारू लागला आहे.कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. सोळशीच्या हरेश्‍वर डोंगरातून उगम पावणारी वसना नदी फक्त सहा महिनेच वाहत असते. नुकतेच शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

खोलीकरण व रुंदीकरण करून सोळशीपासून पळशीपर्यंत नदीवर सत्तावीस बंधारे बांधण्यात आले आहेत. गेल्या कित्येक वर्षात कोरड्या पडलेल्या नदीला या बंधार्‍यामुळे नवसंजीवनी मिळाली. गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसाने सर्व बंधारे तुडुंब भरून नदी वाहू लागली. मात्र तो आनंद औट घटकेचा ठरला. सातत्याने पर्जन्यमान कमी झालेले असल्याने साठलेले पाणी जमिनीत मुरले व पुन्हा नदी कोरडी पडली. यंदाचा पावसाळा जवळपास संपत आला आहे. मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सोळशी, नायगांव, रणदुल्लाबाद, करंजखोप, सोनके, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, चौधरवाडी, सर्कलवाडी, राऊतवाडी, घिगेवाडी, दहिगाव, आसनगाव, वाठार स्टेशनसह संपूर्ण उत्तर कोरेगाव तालुक्यात यावर्षी वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. अपुर्‍या पावसावरच खरिपाच्या हंगामाची मशागत व पेरणी शेतकर्‍यांनी उरकली. सध्या घेवडा, वाटाणा, सोयाबीन, धना, चवळी, मूग यासह सर्वच पिके जोमात आहेत. मात्र पिके ऐनभरात आलेली असतानाच पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम नुकसानीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनच्या पावसाचे दिवस जवळपास संपत आले आहेत. पण ओढेनाले, विहिरी, छोटे-मोठे पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

परतीच्या पावसाने पाठ फिरवली तर मात्र खूप मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पश्‍चिम भागात धो-धो बरसणार्‍या वरुण राजाने पूर्वेकडे पाठ फिरवली आहे.नजीकच्या काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न उग्र रूप धारण करू शकतो. याशिवाय सध्याच्या खरीप हंगामातील घेवडा पिकावरही मोठ्या प्रमाणात कीड आली असून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. गतवर्षी उत्पादन चांगले होऊनही दर नसल्याने शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले होते.ही नैसर्गिक आपत्तीची मालिका शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयारी नाही.आता यावर्षी वरुणराजाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.