कॉलेज परिसरात टपोरी जोरात पोलिस कोमात


सातारा : गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालय परिसरात मुली, युवतींची छेड काढण्याचे प्रकार वाढू लागल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातार्‍यातच गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीन गंभीर घटना घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात रोड रोमिओ, टपोरी, हुल्‍लडबाज जोमात असून पोलिस मात्र कोमात गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, निर्भया पथकाची भिरकीट कमी झाल्यानेच शाळा, महाविद्यालय परिसरातील गुंडगिरी, दहशत वाढू लागली असून ते पथक पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा शहरासह परिसरात शाळा व महाविद्यालयाचा मोठा परिसर आहेे. शहरासह जिल्ह्यामधील व शेजारच्या जिल्ह्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी शिकण्यासाठी सातार्‍यात येत असतात. पुणेनंतर सातारा शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकत असणार्‍या मुली, युवतींना मात्र नाहक त्रास होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. तीन वर्षांपूर्वी तर इतकी भीषण परिस्थिती होती की कॉलेज परिसरातील रोड रोमिओ, टपोरींच्या छेडछाडीपासून युवतींना सुरक्षितता मिळावी यासाठी पोलिस दलाच्या व्हॅनने युवतींना बसस्टॉप ते महाविद्यालयात सोडले जात होते.

अडीच वर्षापूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचा चार्ज घेतल्यानंतर ते सातार्‍याच्या भेटीवर आले होते. त्यावेळी महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधल्यानंतर युवतींनी महाविद्यालयाच्या बाहेरील परिसर ते बसस्टॉपपर्यंत सुरक्षित वाटत नसल्याची उघड उघड प्रतिक्रिया देवून त्यावर प्रभावी मार्ग काढण्याची विनंती केली होती. या घटनेची गंभीर दखल घेवून नांगरे-पाटील यांनी शी (एस.एच.ई.) म्हणजेच निर्भया पथकाची निर्मिती करुन ही संकल्पना राबवण्याचे आदेश दिले होते.

तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाणे व प्रमुख शहरांना दिले. या पथकाला चारचाकी व्हॅन, महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी सामाजिक स्वंयसेवी संघटनेतील महिला यांची मिळून ही टीम होती. ही टीम सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी जावून छेडछाड करणार्‍यांना टिपत होते. संबंधित हुल्‍लडबाजांना हेरुन पोलिस त्यांचे समूपदेशन करत सक्‍त ताकीद देवून सोडत होते. दुसर्‍या कारवाईवेळी मात्र तोच संशयित जर सापडला तर त्याच्या आई-वडील, कुटुंबियांना बोलावून त्यांच्यासमोर ताकीद दिली जात होती. या शिक्षेमुळे हुल्‍लडबाजाली कमालीचा चाप बसला होता.

गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांकडून निर्भया पथकाद्वारे अशा पध्दतीने कारवाई केल्याने मुली व युवतींना सुरक्षित वाटत होते. जून-जुलै 2018 मध्ये पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. मात्र निर्भया पथक सक्रीय नसल्याचे चित्र आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात महिला पोलिस, पोलिसदादा दिसत नसल्याने भुरट्यांचे पेव फुटले आहे. बेदरकार दुचाकी, चारचाकींची वर्दळ शाळा, महाविद्यालय परिसरात कमालीची वाढलेली आहे. यामुळे मुली, युवती व महिला शिक्षकांमध्येही असुरक्षेची भावना आहे.

गेल्या दोन वर्षापासून शाळा, महाविद्यालय परिसरातील छछुरगिरी नियंत्रणात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग छेडछाडीच्या घटना घडत असल्याने त्याला वेळीच प्रतिबंध केला पाहिजे. नुतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘निर्भया पथक’ अ‍ॅक्टीव्ह ठेवण्याच्या सूचना करणे गरजेचे आहे. पोलिस उपविभागीय कार्यालय सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी आहे. डीवायएसपी गजानन राजमाने यांनी सातार्‍यात जुगार, मटका, अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावलेला आहे. अशा धडाकेबाज अधिकार्‍याने टपोरीबाजी करणार्‍यांना धडा शिकवल्यास छेडछाडीच्या घटनांना पायंबद निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

शहरी भागात मुली, युवती असुरक्षित असतानाच ग्रामीण भागातही अशी भयावह परिस्थिती असल्याचे चित्र आहे. अनेकदा तर मुली, युवती छेडछाडीच्या होत असलेल्या त्रासाबाबत घरी कुटुंबियांना सांगत नाहीत. कारण असे काही घडत असल्याचे सांगितले की शिक्षण, महाविद्यालयाचे पुढील शिक्षण थांबणार अशी अटकळ असते. यामुळे मुली, युवती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे विदारक वास्तव आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा शहरासह उपनगरात छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी एक युवती डीजी कॉलेज ते पोवई नाका परिसरातून चालत जात असताना रोडरोमीओने पाठलाग करुन छेडछाड काढली. संबंधित युवती घाबरत घाबरत अखेर वाहतूक पोलिसाकडे गेली व तिने घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. दुसर्‍या घटनेमध्ये सदरबझार, क्षेत्रामाहुली येथे क्‍लासला येणार्‍या मुलीची छेड काढली गेली असून या घटनेने मुलीसह तिचे कुटुंबिय भितीच्या छायेखाली आहेत. तिसर्‍या घटनेमध्ये करंजे परिसरातही अशीच घटना घडली असून यामध्ये तर संशयितांनी धारदार चाकूसारखे शस्त्र दाखवून मुलीचा विनयभंग केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार होत असल्याचे समोर आले असून मुलीची मानसिकता बिघडत आहे.

No comments

Powered by Blogger.