हिंदी विषय शिक्षकांसाठी सातारा येथे उद्‌बोधन वर्गाचे आयोजन


बुध : जिल्हा परिषद सातारा माध्यमिक शिक्षण विभाग व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे राष्ट्रभाषा भवनात दिनांक 27 व 28 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत जिल्हास्तरीय उद्‌बोधन वर्गाचे आयोजन केले असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व हिंदी मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी दिली.

या उद्‌बोधन वर्ग इयत्ता आठवी हिंदी विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. सदर उद्‌बोधन वर्गात बालभारतीच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य व भाषा अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण वर्गामध्ये हिंदी शिक्षणाची उद्दिष्टे, पुनर्रचित अभ्यासक्रमाचे आधार, अभ्यासक्रमाचे स्वरूप, भाषिक क्षमता, ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धती, कृती उपक्रम, प्रकल्प, भाषिक कौशल्य, शैक्षणिक साधन, क्रियात्मक व्याकरण, मानक वर्तनी, जीवन कौशल, केंद्रीय तत्व, गद्य पद्य पाठ उद्दिष्टे इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले तज्ञ मार्गदर्शक दिनांक 31 ऑगष्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत तालुका स्तरावरील शिक्षक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत.

तालुका स्तरावरील प्रशिक्षण दोन टप्प्यात आठ केंद्रावर होणार असून प्रशिक्षण केंद्र व समाविष्ट तालुके याप्रमाणे दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर राष्ट्रभाषा भवन संभाजी नगर सातारा (सातारा व जावली), द्रविड हायस्कूल वाई (वाई ,खंडाळा व महाबळेश्वर ), यशवंत हायस्कूल कराड (कराड ), श्री क्षेत्रपाल विद्यालय आडुळ( पाटण), दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2018 दि मॉडर्न इंग्लिश स्कूल कोरेगाव (कोरेगाव), छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुज (खटाव), महात्मा गांधी विद्यालय दहिवडी (माण), मुधोजी हायस्कूल फलटण (फलटण), जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्गात उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांचा प्रशिक्षण काल सेवाकाल समजण्यात येणार आहे. त्यांना दिला जाणारा प्रवास व दैनिक भत्ता नियमांच्या अधीन राहून अनुदानास पात्र राहील.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे अशा शिक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी 27 व 28 ऑगस्ट रोजी व तालुका स्तरावरील प्रक्षिणासाठी नियोजित तारखेस शालाप्रमुखांनी माध्यमिक विद्यालयातील आठवीला हिंदी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना वेळेवर पाठवावे असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सूर्यवंशी व खटाव तालुका अध्यक्ष पोपट मिड यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.