Your Own Digital Platform

प्लास्टिक, थर्माकोल बंदीला कोलदांडा


सातारा : शासनाने 23 जूनपासून केलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीला अनेक ठिकाणी कोलदांडा दिला जात आहे. विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि प्लास्टिक बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे शासनाने लावलेली बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधीत कारवायांचा फार्सच ठरल्याची चर्चाही आहे. महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणार्‍या छोटे-मोठ्या उद्योगांकडून सध्या उत्पादन बंद असल्याचे सांगण्यात येते.

बाजारपेठेतही बंदी असलेल्या साहित्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात येते. एखाद्याने बंदी असलेल्या साहित्यांची मागणी केल्यानंतर विक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. तरीही समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा बोलबाला दिसत आहे. बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये बाटलीबंद पाण्याचा वापर होताना दिसतो. शासनाने ज्या मर्यादेपर्यंत प्लास्टिक वापरण्यास परवानगी दिली आहे त्या मर्यादांचे उल्लंघन करणार्‍या प्लास्टिक वस्तूंचा विविध समारंभात वापर होताना दिसत आहे. स्टीलच्या प्लेट, वाट्या, ग्लास वापरले तर त्यांना स्वच्छ करण्याचा त्रास, या सर्व गोष्टींपासून सुटका मिळावी या सबबीखाली या पत्रावळींचा वापर सुरूच आहे. थर्माकोलच्या पत्रावळी फेकून देण्यात आल्यानंतर त्यामध्ये उरलेले अन्न जनावरेदेखील खात आहेत. अशावेळी पत्रावळीही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणासह जनावरांच्या जिवालाही हे धोकादायक ठरत आहे.

अख्ख्या सातारा शहराचा जणू कचरा डेपो बनला आहे. चौकाचौकात, गल्लीगल्लीत कचर्‍याचे ढीग जमा झाले आहेत. नाल्याचा तर गळाच थर्माकोल व प्लास्टिकने घोटला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात तरंगत आहे. तर कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. यात थर्माकोलच्या पत्रावळ्या बाहेर पडलेल्या दिसत आहेत. नष्ट न होणार्‍या थर्माकोल, प्लास्टिकच्या प्रदूषणाची कल्पना येऊ शकते; मात्र अजूनही नगरपालिकेचे याकडे लक्ष गेले नाही. येत्या काळात जोरदार पाऊस झाला तर नाल्याचे पाणी आसपासच्या रहिवासी परिसरात शिरू शकते. नपाच्या अधिकार्‍यांनी वेळातवेळ काढून थोडे इकडेही लक्ष द्यावे, थर्माकोल काढून नाला मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. 

प्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांचा साठा संपविण्यासाठी शासनाकडून वेळ देण्यात आला होता, तरीही अनेकांकडे अद्यापही बंदी असलेल्या उत्पादनांचा साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून छुप्या पद्धतीने त्याची विक्री आणि वापर होत आहे. साठा जरी जुना असला तरी त्याचा वापर केला तर कारवाई होऊ शकते. बंदी असलेल्या वस्तूंचे उत्पादन होत नसल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.