विश्वासघात कराल तर जनतेचा विश्वास गमवाल


म्हसवड : जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे, त्यांचा विश्वासघात करू नका. नाहीतर जनता पुन्हा राजकियच काय वैयक्तीक जीवनातही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशा शब्दात शेखर गोरे यांनी नगरसेवकांना कानपिचक्‍या दिल्या. दरम्यान, सध्या न्यायालयीन प्रक्रियेत व्यस्त असून ती पूर्ण झाल्यानंतर दर बुधवारी म्हसवड शहरवासियांसाठी जनता दरबार भरवणार असून त्यावेळी केवळ जनतेचेच ऐकले जाईल, असेही शेखर गोरे यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयीन प्रक्रियेसाठी शेखर गोरे म्हसवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. म्हसवड पालिकेतील सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नगरसेवकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. नुकताच मातीमिश्रीत वाळूचा ठराव बेकायदेशीरपणे मंजुर करण्याचा प्रकाराबाबत शेखर गोरे यांना विचारले असता गोरे म्हणाले, जनतेने पदाधिकाऱ्यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले, परंतु, पदाधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. 

वाळूचा ठराव करताना ज्यांनी निवडून दिले त्या नदीपात्राशेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीचा विचार करायला हवा होता. हा उद्योग करणाऱ्यांना नगराध्यक्ष व नगरसेवकांना पाठीशी घालणार नसून योग्य वेळ आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. मी व माझे प्रामाणिक कार्यकर्ते जनतेबरोबरच असून जनताही माझ्याबरोबरच आहे. सद्या न्यायालयीन प्रक्रीयेत व्यस्त असून ही प्रक्रीया पुर्ण झाल्यावर स्वत: पालिकेत लक्ष घालून जनतेला दिलेला शब्द पुर्ण करणार आहे. दर बुधवारी पालिकेत जनता दरबार घेणार असुन तिथे फक्त जनतेचेच ऐकले जाईल. जनतेनेही येणाऱ्या समस्या थेट मला सांगाव्यात, त्या सोडवल्या जातील, असा विश्वास म्हसवडकरांना दिला.

No comments

Powered by Blogger.