चैतन्य पतसंस्थेविरोधात ठेवीदार आक्रमक


वडूज : येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने व संस्था मालक व संचालक यांच्यावर गुन्हे दाखल होत नसलेच्या निषेधार्थ आज सर्व ठेवीदारांनी खटाव तहसील कार्यालयावर संस्थेच्या विरोधात मोर्चा काढला.

गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेविरोधात ठेवीदारांमध्ये कमालीचा संताप उसळला आहे. ठेवीदारांनी सहकार खाते, पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.

याबाबत तहसिदारांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार, चेअरमन संजय इनामदार काही महिन्यापासून पसार आहेत. काही ठेवीदरांनी त्यांच्यावर गुन्हे नोंद केलेले असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तसेच संचालक व कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्यास पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे. प्रत्येकवेळी ठेवी परत करण्याचे फक्त आश्वासनच दिले जात आहे. प्रत्यक्षात ठेवी परत दिल्या जात नाहीत. ज्यांनी सोने तारण करुन रक्कम घेतली आहे व ती रक्कम परतफेड केली आहे, अशा लोकांचे तारण ठेवलेले जिन्नस परत दिलेले नाहीत.

तालुक्‍याच्या विविध भागांतील लोकांनी कोट्यवधी रूपयांच्या ठेवी ठेवल्या गेल्या दोन वर्षांपूर्वीमध्ये नोटाबंदीपासून ठेवींच्या रक्कमेची मागणी केल्यानंतर रक्कमा परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवींच्या रक्कमेची अफरातफर केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.

दरम्यान, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून असमाधानकारक उत्तर मिळाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच या अधिकाऱ्याला जाब विचारला असता त्यानी पोलिसांकडे बोट वळवले. मात्र, पोलिसांनी आम्ही फक्त संरक्षण देवू शकतो, असे म्हणत अनुत्तरीत झाले. यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सर्व ठेवीदारांना कक्षात बोलावून चर्चा करून थोड्याच दिवसात तोडगा काढू असे आश्वासन दिले. योग्य तोडगा न निघाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन व बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ठेवीदारांनी मानवाधिकार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष अतुल पवार यांनाही निवेदन दिले.

No comments

Powered by Blogger.