आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कराडात गणेशोत्सवासाठी कापडाची मंदिरे
कराड : प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या पिशव्या तसेच पॅलिस्टायरिन (थर्मोकॉल) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या विघटनशील वस्तूंवर राज्य सरकारने बंदी घातल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गाने यंदाच्यावर्षी गणेशोत्सवात सजावटीसाठी प्लॅस्टिक व थर्मोकॉलच्या वस्तूंऐवजी कापडापासून बनविणार्‍या सजावटीच्या वस्तू व थर्माकॉलचे गणेश मंदिर विक्रीस ठेवली आहेत. दरम्यान, गणेशमूर्ती कारागिरांनी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मुर्ती तयार केल्या आहेत.

गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात थर्मोकॉलच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. मात्र थर्मोकॉल विघटनशील असल्याने याचा मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसतो. विषेशत: गणेश विसर्जनानंतर हा कचरा नदी, ओढे याठिकाणी साचून राहतो. त्यामुळे थर्मोकॉलवर सरकारने बंदी घातल्यानंतर याबाबतचे प्रबोधन नगरपालिकेने केले. याबाबत पालिकेत सजावटीचे वस्तू विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची बैठक घेऊन प्रबोधन केले.

यावेळी आरोग्य सभापती प्रियांका यादव, उपअभियंता आर. डी. भालदार यांनी माहिती दिली. यावेळी व्यापार्‍यांनी शिल्‍लक असलेल्या साहित्याची विक्री करावी काय? असा सवाल केला मात्र शिल्‍लक साहित्य पालिकेत जमा करावे असे व्यापार्‍यांना सांगून सजावटीसाठी थर्मोंकॉल वापरण्यात आले तर कारवाई करणार असल्याचे व्यापार्‍यांना सांगण्यात आले. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच एन्व्हायरो नेचर फ्रेंडस् ग्रुप यांच्याकडून व्यापार्‍यांमध्ये प्रबोधन केले जात असल्याने थर्मोकॉलला पर्याय कापडाच्या वस्तू वापरण्यात येत आहे. शहरातील कारागिरांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी यंदा शाडूंच्या मूर्ती करण्याकडे लक्ष दिले असून यामुळे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार आहे.