जनता क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको


औध : तहसीलदार व बांधकाम विभाग (ता. खटाव) यांना नांदोशी पुलाच्या दुरुस्तीबाबत वारंवार लेखी तसेच तोंडी सूचना देऊनही पुलाचे काम होत नसल्याने जनता क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.

औंध घाटमाथा जाणाऱ्या रस्त्यावरती नांदोशी नजीकचा पूल म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे एक ठिकाणच मानले जाते. या पुलावरती कोणतेही संरक्षण कठडे, सूचना फलक, सुरक्षा खांब, रिप्लेक्‍टर नाहीत, वळणाच्या ठिकाणी असलेला हा अरुंद पूल आतापर्यंत काही प्रवाशांचा जीवघेणे ठरलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात अनेक सूचना देऊन सुद्धा या पुलाकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा या पुलावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वाराला पुलाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोन युवक ओढ्यात घसरले. त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. 

हा सर्व प्रकार लक्षात येताच जनता क्रांती दलाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी गणेश इंगळे यांनी अशी माहिती दिली की, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी अनेक वेळा याची माहिती दिली असता त्याच्याकडे प्रशासन कोणत्याही पद्धतीचे लक्ष देत नसल्याचे गेले अनेक वर्षे दिसून येत आहे. म्हणूनच आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत. प्रशासनाने तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार औंध व नांदोशी ग्रामस्थांमधूनही होत आहे.

No comments

Powered by Blogger.