Your Own Digital Platform

साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा


सातारा : करंजे सातारा येथील शिवप्रेमी सुधन्वा गोंधळेकर याच्यावर अन्याय्य कारवाई केल्याच्या निषेधार्थ करंजे ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने साताऱ्यात शनिवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. आनंदवाडी दत्तमंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकऱ्यांनी घोषणा देवून आपला निषेध व्यक्‍त केला. पोलिसांच्या कायदाबाह्य वर्तनाची चौकशी व दोषींवर कारवाई तसेच गोंधळेकर यांची मिडिया ट्रायलद्वारे होत असलेली मानहानी या मागण्या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांना शिष्ट मंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. कायदा सुरक्षिततेचा उपाय म्हणून घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

10 ऑगस्ट 2018 रोजी करंजे येथील सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसने अटक केली. या गोष्टीच्या विरोधात शनिवारी समस्त करंजेकर ग्रामस्थांच्यावतीने एकत्र येऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आनंदवाडी, शाहूचौक, आयडीबीआय चौक, महाराजा हॉटेल पिछाडीच्या रस्त्याने मोनार्क मार्गे पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला. मोर्चामध्ये शासनाचा निषेध करणारे अनेक फलक लक्ष्य वेधून घेत होते. मोर्चे कऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एटीएसचा निषेध व्यक्‍त केला. गोंधळेकर यांचे कौटूंबिक व सामाजिक पार्श्‍वभूमी पाहता पोलिसांकडून कायदाबाह्य कृती घडल्याची तक्रार यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. करंजेकर ग्रामस्थ व हिंदूत्ववादी संघटनेच्यावतीने जिल्हाप्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. गोंधळेकर यांना 8 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. मात्र अटक 10 ऑगस्ट रोजी दाखवण्यात आली. असे का? असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला.
एटीएसच्या गोंधळेकरांच्या कुटूंबियांना कल्पना न देता चाललेल्या गुप्त कारवाया यावरही आक्षेप घेण्यात आला. आणि या प्रकरणातील दोषी प्रवृत्तींवर कारवाई करून गोंधळेकर यांना सन्मानाने मुक्‍त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

सनातन संस्था आणि तिचे साधक गेली दोन दशके हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार करत आहेत. भ्रष्टाचार लुटालूट, अन्याय यांच्याविरोधात वैध मार्गाने लढा देत आहेत. मात्र सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती यांना खोट्या प्रकरणात गोवून बंदी आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ठाणे व मडगाव यापैकी कुठल्याही बॉंम्बस्फोटातील आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आलेले नाही. 2011 साली सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसने केंद्रशासनाकडे पाठविला होता. मात्र पुराव्याअभावी बंदी घालू शकत नाही असे सांगून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. जर अशा प्रकारचा फेर प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा अशी मागणी सनातन संस्थेच्यावतीने करण्यात आली.