आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कळसकरला ‘रेकी’त गोंधळेकरची मदत


सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर हे ‘अंनिस’च्या माध्यमातून हिंदू परंपरेविरोधात बोलत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांना त्यांना संपवायचे होते. त्यासाठी डॉ. दाभोलकर यांचा दिनक्रम काय? ते कोणत्या वेळेस कुठे जातात? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं? या सर्व बाबींची माहिती हत्येची कबुली दिलेल्या शरद कळसकरने काढली होती. यामध्ये सुधन्वा गोंधळेकर याने सातार्‍यात राहून कळसकरला डॉ. दाभोलकर यांच्या ‘रेकी’साठी मदत केली असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी 7 च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी पुण्यात बाहेर पडले होते. पुण्यातील ओंकारेश्‍वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला होता. मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी कोणी झाडली? बाईकस्वार कोण होता? या प्रश्‍नांनी गेली 5 वर्षे तपास यंत्रणांची झोप उडाली होती. अनेक तपास आणि चौकशा केल्यानंतरही हत्येचा क्ल्यूू लागत नव्हता.

अशातच नालासोपारा, मुंबई येथून हिंदुत्ववादी संघटनेचा वैभव राऊत याच्याबाबत मुंबई एटीएसला शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी घर व दुकानात छापा टाकला असता तेथून 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार केलेल्या पिस्टल बॉडी, 3 अर्धवट मॅग्झीन, 7 अर्धवट पिस्टल स्लाईड, 16 रिले विथ स्मिथ मिळून आले. यावेळी वैभव राऊत याच्या संपर्कात सातार्‍याचा सुधन्वा गोंधळेकर हा सहकारी असल्याचे समोर आल्यानंतर त्यालाही अटक करुन लगेचच दि. 11 ऑगस्ट रोजी सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरात धाड टाकली असता तेथून बंदूक, पिस्टल व काही कागदपत्रे जप्त केली गेली. दरम्यानच्या काळात गोंधळेकरच्या सातार्‍यातील घरी व कार्यालयात धाड टाकून एटीएसने आक्षेपार्ह नोंदी असलेल्या डायर्‍या जप्त केल्या होत्या. तर कोडवर्डमध्ये असलेले संदेशही जप्त करण्यात आले होते.

वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व शरद कळसकर यांना मुंबई एटीएसने अटक करुन चौघांकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात चौकशी केली असता सचिन अंदुरे याने त्यांची हत्या केली असल्याचे कळसकरने सांगितले. त्यानुसार मुंबई एटीएसने सचिनला औरंगाबादमधून उचलल्यानंतर हत्येची कबुली देवून त्यामध्ये सहभागी असणार्‍या व एकूण प्लॅनिंगची सर्व माहिती दिली.

सचिन अंदुरे याने मुंबई एटीएस व नंतर सीबीआयला दिलेली माहिती अशी, डॉ.नरेंद्र दाभोलकर हे नेहमी हिंदू परंपरेच्या विरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळे आम्हाला त्यांना संपवायचे होते. त्यासाठी आम्ही दि. 20 ऑगस्ट 2013 पूर्वीही त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र, मायक्रो प्लॅनिंग करून यांची हत्या करण्यासाठी कळसकर याने ‘रेकी’ केली होती. मॉर्निंग वॉकला जात असताना पुलावरच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून खून केला.

याप्रकरणी सचिन अंदुरेच्या चौकशीतून आणखी एक नवीन माहिती समोर आली. ज्या दिवशी दाभोलकरांवर गोळीबार झाला त्या दिवशी सचिन अंदुरे हा दुसर्‍या दुचाकीवरून पसार झाला होता. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते त्यात सचिन अंदुरे आणि त्याचा साथीदार दोघेही मोटारसायकलवरून आले नाहीत. सचिन आणि त्याचा सहकारी दोघेही ओंकारेश्‍वर पुलावरच उभे होते. दाभोलकर समोरून येत असता दोघांनी त्यांच्याजवळ जाऊन गोळ्या झाडल्या. या दोघांनी दाभोलकरांवर राऊंड फायर केले. धक्कादायक म्हणजे या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बंदुकीचा कारखाना केव्हापासून सुरू आहे याची प्रचिती येते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करायचे निश्‍चित झाल्यानंतर ती हत्या सातार्‍यात करायची की अन् कुठे? कारण हत्या करण्यापूर्वी जे प्लॅनिंग तयार झाले त्यानुसार तेथून पळूनही जाता आले पाहिजे. याची ‘रेकी’ही कळसकर याने केली होती. सातारा व पुणे ही दोन ठिकाणे विचारात घेण्यात आली. त्यामध्ये पुणे हे मोठे शहर असल्याने तेथून सातार्‍याच्या तुलनेत लवकर पळून जाणे शक्य होते व दहशतही मोठ्या प्रमाणात बसेल या हेतूनेच पुणे हत्येसाठी निश्‍चित करण्यात आले. पुणे ते औरंगाबाद हे अंतर सुमारे 250 किलोमीटर आहे. त्यामुळे कळसकर व अंदुरे यांना रेकीच्या कालावधीत औरंगाबादेतून मदत मिळणे शक्य नव्हते. तर या कालावधीत रेकी करत असताना पुण्यातील रस्त्यांची माहिती, पोलिस चौक्या, वाहतूक कोंडीची ठिकाणे, डॉ. दाभोलकर यांचे वास्तव्य करत असणारे ठिकाण दि. 19 ऑगस्ट रोजी त्यांच्या मुक्कामाची माहिती ही सर्व तांत्रिक माहिती सातारा किंवा पुण्यातील रहिवाशाशिवाय मिळणे शक्य नव्हते. त्याचबरोबर त्या दोघांच्या राहण्याची सोय, वाहनाची सोय, शस्त्रास्त्र लपवण्याची जागा या गोष्टी पुरवण्यासाठी या दोघांना जवळचा माणूस असणे गरजेचे होते. 

या सर्व बाबींची माहिती देवून कळसकर व अंदुरेला गोंधळेकर यानेच सेफ झोनमध्ये ठेवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फायरिंग केल्यानंतर या दोघांसाठी चावी लावून मोटारसायकल तयार करून ठेवली होती. त्या मोटरसायकलवरून सचिन आणि त्याचा साथीदार पळाले, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. पुलाजवळ चावी लावून कुणी गाडी आणून ठेवली होती ? अजून किती लोक यात सहभागी होते? असे सवाल आता उपस्थित झाले आहे. हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी? याचा तपास सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का? जी शरद आणि सचिनने वापरली होती, याचा तपास आता सुरु झाला आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सोमवारी बरोबर 5 वर्षे पूर्ण होत आहेत. डॉक्टरांवर एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक झालेली असून यामध्ये विरेंद्र तावडे, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळस्कर, सचिन अंदुरे यांचा समावेश आहे. यामुळे पाच वर्षे, पाच गोळ्या व पाच जणांना अटक अशाप्रकारे हिसाबकिताब बरोबर झाला असल्याचा एक योगायोग झाला आहे. अर्थात ट्रेलर, इंटरव्हल झाला असून पिक्चर अद्याप बाकी असल्याचेही वास्तव आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला सीबीआयने अटक केली असल्याने ही महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. तपासाच्या दृष्टीने हे योग्य दिशेने पडलेले पाऊल आहे. तपास यंत्रणेने एवढ्या पुरते मर्यादित न राहता याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत? त्याच्यापर्यंत तपास यंत्रणेने पोहोचावे, अशी अपेक्षा आहे. या घटनेची उकल करण्यासाठी निश्‍चितच उशीर झालेला आहे; परंतु उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या सगळ्यावर देखरेख केली असून त्या माध्यमातून तपासामध्ये प्रगती झाली आहे; मात्र एवढ्यावर सरकारने न थांबता जोपर्यंत यामागचे मुख्य सूत्रधार सापडत नाहीत, तोपर्यंत ‘अंनिस’तर्फे ‘जवाब दो’ हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत. -डॉ. हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर व इतर तीन विचारवंतांच्या हत्यांमागचेे मास्टर माईंड एकच आहेत. उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलेल्या याचिकेमुळे आतापर्यंत या प्रकरणातील ही महत्त्वाची दुसरी अटक ठरलेली आहे. दाखल केलेली याचिका व न्यायव्यवस्था याच्यामुळेच हा तपास हळूहळू गती घेत आहे. ‘आम्ही सारे दाभोलकर’ या भावनेने या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागून सहभागी असणार्‍या सर्वांचा बुरखा फाटेपर्यंत आम्ही लढा देणार आहोत. - मुक्ता दाभोलकर