आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

दाभोलकर हत्या प्रकरण : हल्‍लेखोरांना प्रशिक्षण कोणी व कुठे दिले?


सातारा : ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सातारा, औरंगाबादची ‘लिंक’ ओपन होत असतानाच बंदूक चालवण्यासाठी हल्‍लेखोरांना प्रशिक्षण दिले गेले असून, ते प्रशिक्षण कोणी व कुठे दिले? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सीबाआयसह मुंबई, पुणे एटीएसने या मुद्द्यांवर ‘फोकस’ केला असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आणखी काही जण ‘रडार’वर असून ‘सातारा’ नावाची एकूण तीन गावे असल्याने या प्रकरणाचा ‘ट्विस्ट’ आणखी वाढला आहे.

‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर सातारा, पुणेसह अवघ्या महाराष्ट्राचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे गावठी बॉम्बसह स्फोटके सापडली. याप्रकरणी नालासोपाराचा वैभव राऊत, सातार्‍याचा सुधन्वा गोंधळेकर व औरंगाबादच्या शरद कळसकर यांना अटक करण्यात आली. धक्‍कादायक म्हणजे सुधन्वा गोंधळेकर याच्या पुणे येथील घरातूनही बंदुका, पिस्टल व बंदुका तयार करण्याचे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. यातील शरद कळसकर याने सचिन अंदुरेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली असल्याचे सांगितल्यानंतर अंदुरेलाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यानेही तशी कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

सातार्‍याच्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक झाल्याने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात जिल्ह्यातील आणखी कोणाचा समावेश आहे का? तसे असेल तर ते कोण? याकडेही जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. सचिन अंदुरे हा अटकेत व कोठडीत असल्याने या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पोलिसांना आता मिळवावी लागणार आहेत.

डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे, लेखक एम.एम.कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या अनुषंगाने या सर्वांची चौकशी केली जात आहे. तपासामध्ये मुख्य सूत्रधार, कटामधील संबंधितांची नावे, प्रत्यक्ष हल्‍लेखोर, शस्त्रास्त्रे अशा अनेक गोष्टींची उकल करण्याचे पोलिसांचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत. अनेक बाजूंची उकल करत असतानाच हल्‍लेखोरांना बंदूक चालवण्यासाठी प्रशिक्षण दिले असल्याचीही चर्चा आहे. यामुळे हल्‍लेखोरांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले असेल तर ते कोणी दिले? प्रशिक्षणासाठी कोणत्या जागा निवडण्यात आल्या? किती जणांना प्रशिक्षण दिले गेले आहे? असे सवाल उपस्थित झाले आहेत. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रात हल्‍लेखोरांना प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये सातारा या ठिकाणी प्रशिक्षण दिले असल्याची चर्चा सुरु असल्याने हे नेमके कोणते सातारा? असाही सवाल उपस्थित झाला आहे. कारण सातारा नावाची एकूण तीन गावे आहेत. बेळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही सातारा नावाची गावे आहेत.

सुधन्वा गोंधळेकर याच्या अटकेमुळे सातारा जिल्ह्यातील अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. सुधन्वा कोणाच्या संपर्कात होता? सध्या ते लोक कुठे आहेत? कोणाच्या कोणत्या हालचाली सुरु आहेत? या सर्व बाबींवर पोलिस लक्ष केंद्रीत करत आहेत.