वाई पालिकेच्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती


वाई : वाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने दररोज पिण्याचे पाणी लाखो लिटर वाया जात आहे. जेजुरीकर कॉलनीतून वाई नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य पाईप लाईनला ही गळती लागली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही गळती सुरु आहे.गळतीमूळे वाई शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

सध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले आहे. परंतु वाई तालुक्‍यात मात्र त्या मानाने पावसाचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे महिन्यातून अनेक वेळा मुख्य पाईप लाईनला गळती लागून पाणी वाया जाण्याच्या घटना घडत आहेत. जेजुरीकर कॉलनीत शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहीर आहे. येथूनच मुख्य पाईप लाईन गेली असून या पाईप लाईनला अनेक ठिकाणच्या वॉलला नेहमीच गळती सुरु असते. परंतु अशा पद्धतीने पाणी वाया जात असेल तर पावसाळयानंतर वाईकर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही बाब गंभीर आहे.

रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या पाईपला गळती लागल्यास त्यामध्ये गटाराचे पाणी जावून विविध साथींच्या रोगांना निमंत्रणच मिळत आहे. स्वच्छ पाणी आणि पाण्याच्या गळतीचा प्रश्‍न विचारात घेता कायम स्वरूपी तोडगा निघावा असे मत व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.