आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

शिंदेवाडी, विंग, राजेवाडी रस्ता गेला खड्ड्यात


शिरवळ :शिंदेवाडीपासून विंग व राजेवाडी रस्त्यातील पडलेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शिंदेवाडी, विंग, राजेवाडी रस्त्यावरती मोठे खड्डे पडले असून त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे याच रस्त्यावरून कामासाठी येणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पहाटे व रात्री कामावर येत असताना वाहनचालकांना जीव धोक्‍यात घालून वाहन चालवावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने खड्ड्यात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे चाक आदळून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यातील खड्डे वाहनचालकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात वाहने एकमेकांना धडकून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालक, कामगार व नागरिकांमधून होत आहे.