आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा


सातारा : भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार, जय अहिल्या..जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण अंमलबजावणी त्वरित करा...नाहीतर खुर्च्या खाली करा,आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय होत आला आहे.

 भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नसल्याने धनगर समाजच्यावतींने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चास दुपाारी १.३० वाजता सुरूवात झाली. या मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी काही धनगर समाजबांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थित होते. मोर्चापूर्वी धनगर समाजबांधवांनी ढोलाच्या तालावर गजीनृत्य केले. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत सैनिक स्कुल मैदानावरून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली.

यावेळी धनगर समाजबांधवांनी जोरदार घोषणा दिल्या. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, ना नेता ना पक्ष आता धनगर दक्ष, देख लेना आखोसे.. आये है लाखोंसे, आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचे यासह अन्य घोषणा देत धनगर समाजबांधवांनी परिसरात दणाणून सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यावर पाच धनगर कन्यांची भाषणे झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनु. जमाती आरक्षणाची अमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन दिले.

No comments

Powered by Blogger.