विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी


लोणंद : विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर ती मागे घ्यावी यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या चौघांविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतीश जिवाजी कचरे (रा. पाडळी, ता. खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पाडळी येथील विठ्ठल जिवाजी कचरे यांच्या विरोधात एक महिन्यापूर्वी पाडळी गावातीलच सौ. गिताबाई पोपट ठोंबरे यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण गावपातळीवर मिटवावे यासाठी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास सतीश कचरे, विठ्ठल कचरे तसेच दादा सोपान कचरे, सोपान कोंडिबा कचरे, हणमंत सर्जेराव धायगुडे, भिकाची जगन्नाथ धायगुडे, विनायक धोंडिबा माने, मोहन प्रल्हाद धायगुडे हे सर्व लोणंद येथील सईबाई हौसिंग सोसायटीच्या रेल्वेगेटसमोरील राहत्या घराच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसले होते. यावेळी गिताबाई पोपट ठोंबरे यांच्या बाजुने असलेले संतोष पोपट ठोंबरे, एकनाथ भिकू चव्हाण, सुनील ठोंबरे उर्फ बावधनकर यांनी विठ्ठल कचरे यांना केसमधून सुटू देणार नाही, तुला दोन वर्षे शिक्षा होईल, तसेच तुझा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही खंडाळा व सातारा येथील कोर्टात अर्ज केला आहे. त्यातूनही तुला जामीन मंजूर झाला तर आम्ही उपोषणाला बसू, असे सांगून तुला जर केस मिटवायची असेल तर आम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. या सर्व प्रकारानंतर भीतीपोटी विठ्ठल जिवाजी कचरे याने 20 ऑगस्ट रोजी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. सध्या विठ्ठल कचरे हे लोणंद येथील खासगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहेत.

दरम्यान, विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या चार जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात भादवी 385/34 कलमान्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.