आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

आ. शिवेंद्रराजेंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
मेढा : जावली तालुक्‍यात वीज वितरण, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग यांच्याबाबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी असून अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजात पंधरा दिवसात सुधारणा करावी अशी तंबी देऊन जावलीकरांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये अशा सूचना देत सर्व अधिकाऱ्यांची आ शिवेंद्रराजेंनी मेढ्यात विश्रामगृहावर चांगलीच झाडाझडती घेतली.

जावली तालुक्‍यात आम्ही जावळीकर व व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजेंनी आज मेढा येथील विश्रामगृहावर वीज वितरण, एसटी महामंडळ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, आंदोलनकर्ते विलासबाबा जवळ उपस्थित होते.

तुम्ही चांगलं काम करत नाही म्हणून नागरिक आंदोलन करतात मात्र लोकप्रतिनिधी म्हणून मला जनतेला उत्तर द्यावे लागते असे उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावत आ. शिवेंद्रराजेंनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा प्रथम समाचार घेतला. नादुरुस्त मीटर त्वरित बदलावेत, वाढीव व चुकीची वीज बिल सर्व्हे करून, तपासून कमी करून द्यावीत, गंजलेले पोल, उघड्या डीपी तातडीने बदलाव्यात अशा सूचना करून तुम्हाला काम तर करावेच लागेल मात्र लोकांशी सौजन्याने बोला नाहीतर जावळीकर जेवढे शांत आहेत तेवढेच आक्रमकपण आहेत याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे असे आ. शिवेंद्रराजेंनी सुनावले.

यावर वारंवार मागणी करूनही नवीन मीटर मिळत नाहीत, पोल बदलण्यासाठी निधी नाही, तालुक्‍यात चाळीस कर्मचारी कमी आहेत अशा अडचणींचा पाढाच वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाचला तरी सुद्धा आम्ही आंदोलनाची दखल घेतली असून तातडीने नादुरुस्त मीटर बदलण्यात येतील, गंजलेले पोल, डीपी बदलण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. चुकीची व वाढीव बिले तपासून कमी करून दिली जातील असे वितरणचे वरिष्ठ अधिकारी सी. जी. चव्हाण, रामकृष्ण शिंदे, प्रशांत गाडे यांनी सांगितले.

नागरिकांशी उद्धट बोलणारे अभियंता अमोल तावरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. तसेच वितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने बोलावे अशी सक्त सूचना दिली असल्याचे सी. जी. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी विलासबाबा जवळ, मेढ्याचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, नगरसेवक दत्तात्रय पवार, कांतिभाई देशमुख आदींनी वितरण बाबत तक्रारी मांडल्या.

एसटीच्या कामकाजातही सुधारणा करा, एखादी नवीन बस सुरु केली नाही तरी चालेल पण आहे त्या बस फेऱ्या वेळेत सोडा प्रवाशांच्या खूप तक्रारी आहेत असे आ शिवेंद्रराजेंनी आगार व्यवस्थापक मोहन महाडिक यांना खडसावल कुसुंबी, मार्ली, वाहिटे, बोंडारवाडी, वागदरे आदी दुर्गम भागातल्या बस नियमित करण्याकडे व विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्या. या भागात मिनी बस वाढवाव्यात अशा सूचना आ शिवेंद्रराजेंनी केल्या.

तालुक्‍यातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करा अशी सूचना करून आ शिवेंद्रराजे म्हणाले, अति पाऊस पडल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र बांधकाम विभागाने जनतेने आंदोलन करण्याअगोदर खड्डे भरावेत यावर बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत खैरमोडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम यांनी पाऊस कमी झाला की खड्डे भरण्यास सुरुवात केली जाईल असे सांगितले.

यावेळी पंचायत समित सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, मोहनराव कासुर्डे, भागुजी पाटील, नगरसेवक अनिल शिंदे, नारायण देशमुख, माजी सरपंच सुजित जवळ, संतोष वारागडे, दीपक शेलार,अजय शिर्के, बाबूशेठ पवार आदी उपस्थित होते.