राणंद येथे दोनशे रुपयांसाठी खून
दहिवडी : केवळ 200 रुपयांची उधारी मागितल्याच्या कारणावरून राणंद, ता. माण येथे एकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. रविवारी रात्री दहा वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन अशोक सावंत (वय 38) असे खून झालेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आरोपी विठ्ठल तयप्पा सावंत (वय 58 ) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार, दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता राणंद येथे संशयित आरोपी विठ्ठल सावंत याने सचिन यांच्या वडिलांकडून काही दिवसांपूर्वी शंभर रुपये घेतले होते. ते पैसे परत मागितल्यानंतर संशयित आरोपीने ‘तुझ्या मुलाला मी दोनशे रुपये दिले आहेत ते आधी दे,’ यावरुन वादावादी झाली.

काही वेळानंतर संशयित आरोपी याने मयत सचिन याच्या घरी जाऊन ‘माझे पैसे परत दे’ यावरून वाद घातला. वाद एवढा विकोपाला गेला की संशयित आरोपीने सचिन यांच्या डोक्यात काठी मारली. हा हल्‍ला एवढा भीषण होता की सचिन जखमी झाले व त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. ही घटना कुटुंबिय व परिसरातील ग्रामस्थांनी पाहिल्यांतर त्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

अवघ्या 200 रुपयांसाठी खूनासारखी गंभीर घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दहिवडी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेवून पाहणी केली. रविवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी घटनेची माहिती सोमवारी दुपारी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. सपोनि प्रवीण पाटील पुढील तपास करत आहेत.

No comments

Powered by Blogger.