Your Own Digital Platform

मेडिकल कॉलेजचा प्रवास अजूनही खडतरच


खेड : सातार्‍यातील मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी प्रत्यक्षात जागेचे हस्तांतरण बाकी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) काढून घेतलेली मान्यता पुन्हा मिळवावी लागणार असल्याने सातार्‍यातील मेडिकल कॉलेजला अजुनही 4 वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

सातार्‍यातील मेडिकल कॉलेजसाठी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाची जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे 4 वर्षांपेक्षा अधिक काळ रेंगाळलेला या कॉलेजच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे. परंतु सातारकरांना लगेचच या कॉलेजच्या सुविधेचा लाभ मिळेल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. प्रशासनाचा निरुत्साह, लोकप्रतिनिधीमधील कलगीतुरा, पाठपुराव्याचा अभाव, श्रेयवाद या मुळे 4 वर्षे या कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न प्रलंबित राहिला.

सातार्‍याबरोबर यापूर्वी मान्यता मिळालेल्या इतर कॉलेजचे बांधकाम पूर्ण होवून प्रत्यक्षात शिक्षणासह सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक उपचाराची सुविधा सुरु झाली. जागेचा प्रश्‍न मिटल्यावर कॉलेज सुरु झाल्याच्या थाटात लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादही रंगला. परंतु अजूनही किती विलंब होईल हे सांगण्यात कोणीच लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत. जागेचा निर्णय लावण्यात 4 वर्षे गेल्यामुळे सातार्‍यातील कॉलेजला मिळालेली मान्यता इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) काढून घेतली आहे. त्यामुळे आता ही मान्यता पुन्हा मिळवावी लागणार आहे. तसेच मंत्रीमंडळाची मान्यता झाली तरी प्रत्यक्षात जागेचे हस्तांतरण वैद्यकीय शिक्षण विभागाकडे होणे बाकी आहे.

त्यासाठी मुख्य सचिवांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. प्रशासकीय कारभारात त्याला किती वेळ जाईल, हे पहावे लागणार आहे. त्यानंतर आयएमएशी पत्रव्यवहार करुन पुन्हा मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मान्यता आल्यानंतर इमारतीच्या बांधकामाचे टेंडर काढता येईल. इमारत पूर्ण झाल्याशिवाय कॉलेजसाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री व स्टाफची भरती करता येणार नाही. इमारत व स्टाफची भरती प्रक्रिया झाल्याशिवाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करता येणार नाही. या सर्व प्रक्रियेला किमान 4 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.