Your Own Digital Platform

वाई-सुरुर रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत


भुईंज : वाईसह पर्यटनस्थळे असणाऱ्या पाचगणी महाबळेश्‍वरला जोडणाऱ्या सुरुर रस्त्याची अवस्था सध्या अतियश दयनीय अशी झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्यावर भरमसाठ आणि मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालविणे फार जिकीरीचे झाले आहे. दरम्यान, गत काही महिन्यांपूर्वी महाबळेश्‍वर नजीक असणाऱ्या खिंगर गावातील एका तरुणाला याच रस्त्यावर अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतरही या रस्त्यावर अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडले आहेत. तरीही गांधारीच्या भूमिकेत असलेल्या बांधकाम विभागाच्या डोळ्यावरील पट्टी निघालेली नसल्याचेच प्रकर्षाने दिसत आहे.

सुरुर ते वाई हे अंतर जवळपास नऊ किलोमीटर इतके आहे. सुरुर, कवठे, वेळे, वहागाव, कवठे, बोपेगाव, ओझर्डे या गावांसह परिसरातील इतरही गावातील शेतकरी वर्गाला आपल्या शेतात पिकविलेला माल विक्रीसाठी तसेच गरजेच्या दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी वाईलाच जावे लागते. त्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. याशिवाय पाचगणी, महाबळेश्‍वरसाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांनीदेखील याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. 

दरम्यान, दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या आणि वाहतुकीची वर्दळ पाहता या सुरुर ते वाई या रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. तसेच सध्या या रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली असून रस्त्या इतके खड्डे पडले आहेत की वाहनधारकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. तरीही बांधकाम विभाग अन्‌ लोकप्रतिनिधींकडूनही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्यानेच या रस्त्यावरील खड्ड्यांना साधा मुुरुमाचाही उतारा मिळालेला नाही.

या रस्त्यावर वाढत असलेली वाहतुकीची वर्दळ आणि अपघातांचे वाढलेले प्रमाण पाहता लवकरत लवकर रस्त्याची दुरुस्ती करुन भविष्यात या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
उरला नाही कुणी वाली वाई ते सुरुर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. 

रस्त्याची अवस्थ अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. अजूनही या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र अपघाताच्या घटना थांबाव्यात किंवा कमी व्हाव्यात यासाठी ना प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत, ना यासाठी लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे या रस्त्याला अन्‌ येथील जनतेला कुणी वालीच उरला नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.