Your Own Digital Platform

रोहन तोडकरच्या मारेकर्‍यांना त्वरित शोधा


कराड : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा भगिनींनी सुरू केलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य, शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला. जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. चाफळमधील रोहन तोडकरच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करण्याची मागणी आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. तर शासनाने दखल घेतली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.

बुधवारपासून कराडमधील दत्त चौक येथील मराठा भगिनींसह बांधवांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासह गुरूवारी दुपारी राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावत पाठिंबा दिला. तत्पूर्वी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक सौरभ पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, माजी सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, पोपटराव साळुंंखे, राजेंद्र माने, माजी नगरसेवक गंगाधर जाधव यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशिद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत पाठिंबा व्यक्त केला.

दरम्यान, आ. पाटील यांनी आरक्षणासह मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडून दाखवल्या जाणार्‍या उदासिन धोरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच चाफळ येथील रोहन तोडकर या युवकाचा नवी मुंंबईत आंदोलनावेळी खून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आ. पाटील यांनी केली. तसेच बेताल वक्तव्ये करून मंत्री सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मराठा समाजाने लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही आ. पाटील यांनी यावेळी केले.दरम्यान, शासन मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेता वेळकाढूपणा करत असल्याचा निषेधार्थ आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा समाज बांधवांनी दिला आहे.