आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

महिला चोरट्यांनी फोडले धान्याचे गोडाऊन


कराड : शहरातील शनिवार पेठेतील मार्केट यार्ड परिसरात असलेले धान्याचे गोडाऊन महिला चोरट्यांच्या टोळीने फोडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांच्या टोळीने सुमारे सव्वा लाख रुपयांची धान्याची 95 पोती गायब केली आहेत. मंगळवारी (दि. 21) सकाळी ही बाब समोर आली. या चोरीप्रकरणी अज्ञात आठ ते दहा महिलांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील हेमंत ट्रेडिंग कंपनीचे मालक हेमंत जयराम ठक्‍कर यांच्या मालकीचे रेस्ट हाऊस बिल्डिंग गोडाऊन नं. 2 मार्केट यार्ड गेट नंबर 2 येथे गोडाऊन आहे. शनिवारी (दि. 18) ते गोडाऊनचे शटर बंद करून घरी गेले. 

त्यानंतर ते मंगळवार दि. 21 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या गोडाऊन पाठीमागील बाजूस काही महिलांची हालचाल दिसली. त्यामुळे त्यांनी अधिक जवळ जाऊन पाहिले असता अनोळखी आठ ते दहा महिला तेथून पळून जाताना त्यांना दिसल्या. त्यामुळे अधिक संशय आल्याने गोडाऊनच्या पाठीमागील खिडकीजवळ जाऊन पाहिले तेव्हा खिडकी उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेमंत ठक्कर खिडकी जवळ गेले असता खिडकीच्या लोखंडी सळ्या काढलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी गोडाऊनचा मुख्य दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता धान्याची पोती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. याबाबतची फिर्याद हेमंत ठक्कर यांनी शहर पोलिसात दिली आहे.