आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

फेसाळणार्‍या धबधब्याची पर्यटकांना साद


सातारा : सातारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगावर बरसणार्‍या धो-धो पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे दिसतात. त्यातलाच एक धबधबा म्हणजे मेढ्याच्या पश्‍चिमेला असलेला एकीवचा धबधबा. हा धबधबा 600 फुटावरून दोन टप्प्यात कोसळत असल्याने पर्यटकांवर मोहिनी टाकतो. मेढा बाजूकडून बघितले तर धबधब्याचा वरचा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजटोपीसारखा दिसतो. कासपरिसरातील पर्यटनाचा हा नवा खजिना उलगडला आहे. 

हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.कासकडून येणार्‍या पाण्यामुळे हा धबधबा तयार झाला आहे. एकीव गावाच्या अगदी मध्यभागी हा धबधबा असून एकीवमधून तो दुंद गावच्या वरती मोठा आवाज करत कोसळत आहे. विशेष म्हणजे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कोणताही त्रास पडत नाही मेढ्यातून कुसुंबी-दुंदमार्गे एकीवला जाता येते तर सातारकडून आल्यास कास रस्त्यावर आटाळी गावाजवळून एकीवला रस्ता फुटला आहे. दोन्ही रस्ते सुस्थितीत असून जाताना कण्हेर धरणाचे आणि बॅकवॉटरचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

पर्यटनासाठी कासला जात असताना अगदी जवळच हा धबधबा असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभर जावली तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने हा धबधबा ओसंडून कोसळत आहे. पंचक्रोशीत या धबधब्याला पाबळ नावाने ओळखले जाते. या धबधब्याच्या वरच्या भागात काळजी घेऊन चिंब चिंब भिजता येऊ शकते मात्र खालचा कोसळणारा भाग दुरूनच पहावा लागतो. तरीही धबधबा पाहताना पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून येणार्‍या पर्यटकांना एकाच मार्गावर भांबवली व एकीवच्या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटता येईल. सोबत कासचे विहंगम दृश्य नजरेत साठवता येईल. हा धबधबा पूर्वी रस्ता नसल्याने पहाता येत नव्हता मात्र आता अगदी धबधब्यापर्यंत डांबरी रस्ता झाल्याने पर्यटकांना विनासायास पर्यटनाचा लाभ घेता येत आहे. हा धबधबा पाहताना अतिउत्साहीपणा अथवा गडबड करू नये. लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच मद्य प्राशन करू नये असे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.

एकीव धबधबा हा सुमारे 600 फूट खोल आहे. दोन टप्प्यात तो कोसळत आहे. पहिला टप्प्यात सुमारे 400 फुटावरून तर दुसर्‍या टप्प्यात 200 फुटावरून पाणी कोसळत आहे. पर्यटकांना पहिला टप्पा सहज बघता येतो मात्र, दुसरा टप्पा हा कड्याच्या बाजूला असल्याने त्या ठिकाणी जाता येत नाही. एकीकडे पूर्ण कडा तर दुसरीकडे गर्द झाडी आहे.

सध्या कास पठारावर फुले बहारण्यास सुरुवात होत आहे. काससह, तापोळा आणि बामणोली याठिकाणी पर्यटक भेटी देत आहेत. त्यातच एकीव धबधबा पाहण्यास पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून पर्यटकांसाठी सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी आम्हीही त्यांना सहकार्य करू. - सोमनाथ जाधव अध्यक्ष, कासपठार कार्यकारिणी समिती.a